मृत बालक सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरकेरी  Pudhari
सातारा

Satara Murder case: पत्नीवरील संशयातून मुलाचा खून

वडोली भिकेश्वर येथील कृष्णा नदीतील बालक मृत्यू प्रकरण उलगडले

पुढारी वृत्तसेवा

मसूर : वडोली भिकेश्वर परिसरातील कृष्णा नदी पात्रात सापडलेल्या अज्ञात बालकाच्या मृत्यूचा उलगडा करत मसूर पोलिसांनी धक्कादायक सत्य समोर आणले आहे. बापानेच सहा वर्षांच्या निष्पाप मुलाचा जीव घेतल्याचे उघडकीस आले असून, या अमानुष घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मृत बालकाचे नाव सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरकेरी (वय 6, रा. नागठाणे, ता. विजापूर, कर्नाटक) असे असून, त्याचे वडील मल्लिकार्जुन आरकेरी यानेच हा निर्घृण खून केल्याची कबुली दिली. पत्नी भाग्यश्री हिच्या चारित्र्यावर संशय घेत हा मुलगा माझा नाही, अशी धारणा त्याला होती. मित्रांकडून होणाऱ्या चेष्टेमुळे हा संशय अधिकच बळावला आणि त्याचे रूप अखेर क्रूर कृत्यात झाले.

16 मार्च रोजी संशयिताने मुलाला निवासी शाळेत प्रवेश देण्याचा बहाणा करून घराबाहेर नेले. वडोली भिकेश्वर हेे निर्जन ठिकाण त्याने गाठले आणि पोटच्या मुलाला निर्दयपणे कृष्णा नदीत ढकलून दिले. 18 मार्च रोजी नदीपात्रात अज्ञात बालकाचा मृतदेह सापडला. मुलाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी तांत्रिक तपासासह विविध स्तरांवर माहिती गोळा करत कन्नड भाषेत छायाचित्रे व माहिती प्रसारित केली. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तपासाला दिशा मिळाली.

संशयित आरोपीकडून मुलगा होस्टेलला असल्याचे खोटे सांगितले जात होते. मात्र त्याच्या उत्तरांतील विसंगतीमुळे त्याची पत्नी भाग्यश्री हिला संशय आला. तिने हरवल्याची तक्रार दिल्यानंतर कर्नाटक पोलिसांनीही तपास सुरू केला. दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून तपासाची कडी जुळत गेली आणि आरोपीचा बनाव उघडकीस आला.

या प्रकरणाच्या तपासात सपोनि आदिनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, प्रदीप पाटील, अमोल पवार, महेश लावंड तसेच वडोलीचे पोलीस पाटील राजू रामगुडे, किशोर कीरतावडे, विवेक साळुंखे यांनी तपासकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT