सातारा : ब्रेन डेड किंवा अवयव दान केलेल्या रुग्णाचे अवयव गरजूंपर्यंत कमी वेळात पोहोचवण्यासाठी भारत एरोमेडिकल रिट्रीवर सर्विसेस व कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनच्या वतीने हवाई वाहतूक सुरू केली जाणार आहे.
आकाश जीवन ही हवाई रुग्णवाहिका मानवी अवयवांची जलद ने-आण करणार असून, अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित उपचारांसाठी मदत होणार आहे. कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन गेल्या काही वर्षांपासून अवयवदान चळवळीचा प्रचार व प्रसार करत आहे. अवयवदात्यांनी अवयव दान केल्यानंतर ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने प्रत्यारोपणात अडचणी येतात. मानवी अवयव माणसाच्या मृत्यूनंतर ठराविक वेळच जीवंत राहतात. त्यावर उपाययोजना म्हणून हवाई रुग्णवाहिका सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी भारत एरोमेडिकल रिट्रीवल सर्विसेर्सचे सहकार्य मिळाले आहे. या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अवयवांबरोबरच अपघातग्रस्त रुग्णांनाही मदत मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आकाश जीवन या हवाई रुग्णवाहिकेचा थांबा कात्रज, पुणे असून सहाशे किलोमीटरच्या परिसरातील वैद्यकीय गरजांसाठी ते कात्रज येथूनच उड्डाण करणार आहे.
अवयवदान व अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये वेळेचे महत्त्व अधिक आहे. प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झालेला अवयव वेळेत गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी एअर गिफ्ट करण्याचा उत्तम पर्याय आहे.- धीरज गोडसे, अध्यक्ष, कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन