फलटण : फलटण तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असून पिकवलेला कापूस खरेदी करण्यासाठी या परिसरात कापूस खरेदी केंद्रच नसल्याने मिरजगाव या ठिकाणी स्वखर्चाने कापूस विक्रीस घेवून जावे लागते. कापसाला मुळातच कमी भाव मिळतोय. त्यातच विक्रीसाठी अधिक खर्च येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादित केलेले पांढरं सोनं विकायचे कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे फलटण पूर्व भागात कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
फलटण पूर्व भाग कापूस पिकाचे आगार बनले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होते. कापूस उत्पादन घेत असताना बदलत्या विपरीत हवामानाशी लढा देत शेतकरी कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतोय. मात्र या परिसरात कापूस विक्रीचे केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. एका खाजगी व्यक्तीने आपल्या कंपनीच्या माध्यमातून हे केंद्र उभारले आहे. मात्र ते अद्याप सुरू झालेले नाही. या ठिकाणाहून पणन विभाग गायब झाल्याचे दिसत असून अशा परिस्थितीत उत्पादित पांढरं सोनं विकायचे कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कपास किसान मोबाईल ॲपद्वारे केली होती. सीसीआयद्वारे महाराष्ट्रात दीडशे कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. मात्र फलटण तालुक्यात या केंद्राचा अद्याप तपासच नाही. 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू झाली आहे. असे असताना फलटणकरांना मात्र कापूस विक्रीसाठी मिरजगाव येथे जावे लागत आहे. 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीमुळे भाव कमी आहेत. त्यामुळे सीसीआय जास्तीत जास्त कापूस खरेदी करत असले तरी याला फलटण अपवाद ठरत आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. शिवाजी गावडे यांनी दिली. संबंधित विभागाने फलटण पूर्व भागात तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
एकेकाळी फलटण शहर, आसू, गुणवरे या ठिकाणी कापूस खरेदी होत होती. आता मात्र ढवळेवाडी, आसू येथे खाजगी व्यक्तीने हे केंद्र उभारले आहे. मात्र त्या ठिकाणी अद्याप खरेदी सुरु करण्यात आली नसल्याचे चित्र असून पूर्व भागातील शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन मिरजगावला जावे लागत असून त्यासाठी क्विंटलला 400 रुपये खर्च येत आहे.