कराड : देशात वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग लागू केला जातो. त्यातून पगारवाढ, विविध भत्ते, निवृत्तीनंतरच्या सुविधा आणि नोकरीची तुलनेने अधिक सुरक्षितता मिळते. मात्र, याच देशात लाखो खासगी कर्मचारी आणि कोट्यवधी शेतकरी आहेत, त्यांच्या आर्थिक सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खासगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वाढती महागाई, घरखर्च, शिक्षण आणि आरोग्याचा खर्च वाढत असताना त्यांच्या पगारात अत्यल्प वाढ होते. अनेक ठिकाणी वार्षिक पगारवाढ केवळ 500 ते 2000 रुपयांच्या मर्यादेतच राहते. दुसरीकडे, शेतकरी वर्गाला शेतीमालाचे हमीभाव, स्थिर उत्पन्न आणि आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न कायम भेडसावत आहे.
यासोबतच एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, ज्या सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात, त्या सुविधा खासगी नोकरदार वर्ग आणि शेतकरी वर्गाला का मिळत नाहीत? आरोग्य सुविधा, आर्थिक सुरक्षा, निवृत्तीची हमी, नियमित वेतनवाढ आणि इतर अनेक लाभ केवळ एका वर्गापुरतेच मर्यादित का राहतात?
हे सर्व धोरणात्मक निर्णय आणि कायदे सरकारच्या नियंत्रणात असताना, देशातील बहुसंख्य असलेल्या सामान्य नागरिकांसाठी अशाच प्रकारच्या संरक्षणाची आणि सुविधांची व्यवस्था का केली जात नाही? सरकारने खासगी कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र वेतन संरक्षण आणि आर्थिक स्थैर्याची योजना का आणू नये, असा प्रश्न आता अधिक तीव्र होत आहे.