सातारा

Electrical Safety : शेतकऱ्यांनो, पावसाळ्यात विजेपासून सावध रहा

विद्युत सुरक्षेला द्या प्राधान्य; विजा, विद्युत पंप व तुटलेल्या तारांपासून सावध राहण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कराड : पावसाळा हा शेतीसाठी नवसंजीवनी देणारा आणि खरीप हंगामाला बळ देणारा ऋतू असला, तरी याच काळात विद्युत अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शेतकरी व वीज ग्राहकांनी विशेष सतर्कता बाळगणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजा कोसळण्याच्या घटना, शेतातील विद्युत पंपांचा वापर, पाण्याने भरलेली शेते, तुटलेल्या वीजवाहिन्या तसेच वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यात पाणी हे विद्युत प्रवाहाचे उत्तम वाहक असल्याने शेतातील विद्युत पंप सुरू करताना किंवा त्याची दुरुस्ती करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ओल्या हाताने स्विच, प्लग किंवा कोणत्याही विद्युत उपकरणाला स्पर्श करू नये. तसेच पाण्यात उभे राहून मोटार, पंप किंवा इतर विद्युत उपकरणांचा वापर करणे टाळावे. कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा बंद केल्याशिवाय विद्युत दुरुस्तीचे काम करू नये.

शेतातील विद्युत पंप, केबल, स्विच, स्टार्टर तसेच घरातील विद्युत वायरिंगची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक दुरुस्ती परवानाधारक विद्युत तंत्रज्ञामार्फत करून घेणे गरजेचे आहे. योग्य अर्थिंग नसल्यास विद्युत धक्का बसण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी व वीज ग्राहकाने आपल्या विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करून सुरक्षिततेची खात्री करावी. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडणे किंवा वीजतारा तुटून जमिनीवर पडण्याच्या घटना घडतात.

अशा वेळी तुटलेल्या वीजतारांपासून सुरक्षित अंतर राखावे. त्या तारांना किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या झाडांना, लोखंडी वस्तूंना अथवा पाण्याला स्पर्श करू नये. अशा प्रकारची घटना दिसून आल्यास तत्काळ महावितरणच्या स्थानिक कार्यालयाला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. शेतकऱ्यांनी आणि सर्व वीज ग्राहकांनी थोडीशी खबरदारी घेतल्यास अनेक विद्युत अपघात टाळता येऊ शकतात. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचे, कुटुंबाचे आणि शेतमजुरांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT