फलटण : फलटण शहरामध्ये गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. काही दिवसातच गणेशाचे आगमन होत असून शहरातील मुख्य रस्ते, उपरस्ते खड्डेमय झाले आहेत. गणेशाचे आगमन सुकर व्हावे यासाठी नगरपालिकेने व संबंधित विभागाने शहरातील रस्ते खड्डेमुक्त करून गणपतीच्या आगमनाला रस्त्यांचा होणारा अडथळा दूर करण्याची आवश्यकता आहे.
फलटण शहर व खड्डेमय रस्ते हे समीकरण फलटणकर नागरिक अनेक दिवसांपासून अनुभवत आहेत. शहरातील मुख्य पेठा, गल्लोगल्लीचे रस्ते, उपरस्ते, वर्दळीच्या रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्यच आहे. वाहनधारकांना, नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरून त्रास सहन करत मार्गक्रमण करावे लागते. मध्यंतरी शहरातील पालखी मार्ग खड्डेमुक्त करण्यात आला होता. त्या मार्गावरही खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. खड्डेमय शहर हे फलटण शहराचे वैशिष्ट्य ठरू लागले आहे. खड्डेमुक्त रस्त्याची मागणी वारंवार केली जाते. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे की प्रशासन हतबल आहे? हे समजून येत नाही. रस्त्यासाठी निधी येतो का? येत असेल तर तो कुठे जातो? रस्ते दुरुस्त का होत नाहीत ? शहरातील नागरिक कर भरतात. कराच्या मोबदल्यात त्यांना सोयी-सुविधा पुरवणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. या जबाबदारीपासून नगरपालिका दूर दूर तर जात नाही ना, असा प्रश्न सुज्ञ नागरिक करू लागले आहेत.
अवघ्या काही दिवसांवर गणपतीचे आगमन आले आहे. अनेक मंडळांच्यावतीने वाजत गाजत मिरवणुकीने बाप्पांचे आगमन होत असते. मात्र ज्या मार्गावरुन मिरवणुका जातात त्या सर्व मार्गावरती खड्डेच खड्डे आहेत. गणपती आगमनापूर्वी मिरवणुकीला अडथळे ठरणारे खड्डे प्रशासन मुजवणार का? गणपती आगमनासाठी दरवर्षी शहरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. खड्ड्यांमुळे वाहनांची कोंडी तसेच पायी जाणार्या नागरिकांना त्रास होतो. फलटण नगरपालिकेने व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. खड्डेमुक्त रस्त्यावरून गणपती आगमन व्हावे, अशी गणेश भक्तांची मागणी आहे.