सातारा : प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याच्या मुद्द्याला दै. ‘पुढारी’ने वात दिल्याने महाराष्ट्रातील फूल उत्पादक शेतकर्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यातील 25 नर्सरींसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमधील फूलरोपांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. आगामी काळातील सुणासुदीत फुलांची मागणी वाढणार असल्याने नर्सरी चालकांनीही शेकडो एकर क्षेत्रावर फुलांच्या रोपांची लागवड हाती घेतली आहे. बाजारात नैसर्गिक फुलांचा सुगंध दरवळू लागला आहे. दै. ‘पुढारी’च्या असली भूमिकेमुळे प्लास्टिकच्या ‘नकली फुलांचा बाजार उठल्याचे’ चित्र पाहायला मिळत आहे.
मनुष्यांसह प्राण्यांचेही आरोग्य धोक्यात आणणार्या प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु आहेत. महाराष्ट्रातील फुल उत्पादक शेतकरी या मुद्यावर आक्रमक होऊन मंत्रालयावर मोर्चा काढणार होते. कोरेगावचे आ. महेश शिंदे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आ. शिंदे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच आपल्या उत्तरात प्लास्टिक फुले धोकादायक असल्याने त्यावर बंदी घातली गेलीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेतली. तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह 14 आमदार व सचिव यांची कमिटी नेमली.
दै. ‘पुढारी’नेही प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याचा मुद्दा लावून धरला. आ. महेश शिंदे यांची रोखठोक मुलाखतही दै. ‘पुढारी’ व ’पुढारी न्यूज’ने प्रसिध्द केली. यानंतर शेतकर्यांचा उत्साह दुणावला असून जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी फूल उत्पादनाकडे मोठ्या संख्येने वळले आहेत. ग्रीन हाऊसमध्ये उपलब्ध असलेल्या फुलांनाही होलसेल व किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी वाढली आहे. एकट्या सातारा जिल्ह्यातील नर्सरी चालकांकडे 25 लाख रोपांची मागणी झाली आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरी या गावातील एकाच नर्सरीतून तब्बल 10 लाख रोपांची विक्री झाल्याचीही माहिती पुढे येत आहे. प्लास्टिक फुलांवरील बंदीमुळे सातारा जिल्ह्यातील फुलशेतीचे क्षेत्र 500 ते 600 एकरवरून पुन्हा एकदा 1200 ते 1500 एकराच्या घरात जाणार आहे.
झेंडू, गुलाब, आर्किड, जरबेरा अशा फुलांच्या रोपांना मोठी मागणी वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांची फूल रोपांसाठी मोठी मागणी आहे. दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यापासून तर आमच्या नर्सरीमधील 10 लाख रोपे शेतकर्यांनी विकत घेतली असून अजूनही रोपांना मागणी असल्याने 150 एकरवर रोपे तयार करण्यास घेतली आहेत.- राकेश कदम, नर्सरी चालक, कामेरी (इस्लामपूर)