सातारा

Satara Fake Fertilizers: बनावट खते व कीटकनाशकांचा साठा जप्त

वडूजला ३० लाखांचा ऐवज हस्तगत : दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

खटाव/वडूज : वडूज, (ता. खटाव) येथील पेडगाव रोड नजीक पृथ्वी प्लॅनेट गृहप्रकल्पाशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे ठेवलेल्या बनावट खते आणि कीटकनाशकांच्या साठ्यावर बुधवारी रात्री पावणेबारा वाजता कृषी विभाग, गुणनियंत्रक आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकत ३० लाख ६० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दिलीप सीताराम काळे ( वय ६० ) आणि प्रतीक दिलीप काळे ( ३४, रा. विठ्ठल नगर, वडूज) यांच्यावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोल्हापूर विभागस्तरीय भरारी पथक व संबंधित यंत्रणांनी बुधवारी रात्री वडूज गावच्या हद्दीतील पेडगाव रोड ते काळेमळा येथील पृथ्वीप्लॅनेट गृहप्रकल्पा शेजारील पत्र्याच्या शेडची तपासणी केली. तपासणीत सदर शेडमध्ये तसेच जवळच्या खोलीत मिळून एकूण १,९८९ गोण्यांमध्ये बनावट दाणेदार रासायनिक खतसदृश साठा आढळला. या साठ्याचे अंदाजे वजन ९९,४५० किलो असून, किंमत २६ लाख ८५ हजार १५० रुपये आहे.

शेडमध्ये ओडिशा येथील कंपनीच्या डिएपी व १० : २६ : २६ या अनुदानित खतांची बनावट नवी छपाई असलेल्या रिकाम्या गोण्या, तसेच शेतकऱ्यांना फसवण्यासाठी त्यात बनावट खत भरून ठेवल्याचे निदर्शनास आले. निंभोरे येथील कंपन्यांच्याही रिकाम्या गोण्या व लेबल्स घटनास्थळी आढळले.

क्लोरोपायरीफॉसच्या १४३ पुड्या (४१,४७९ रु), झिंक फॉस्फाइडच्या १५६ पुड्या (३,९०० रु ) आणि बोरिक ॲसिड पावडरच्या १००० पुड्या (२ लाख ४० हजार रु.) असा बनावट कीटकनाशक साठाही जप्त केला. गोण्या शिवण्याचे शिलाई मशिन आणि पाऊच फिलिंग मशिन असा एकूण ३० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दिलीप सीताराम काळे आणि प्रतीक दिलीप काळे या संशयितांना बनावट खत व कीटकनाशक कोणाकडून, कोठून खरेदी केले. तसेच नामांकित कंपन्यांच्या गोण्या कोठे छापून घेतल्या याबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

कारवाई पथकात साताऱ्याचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, कोल्हापूरचे तंत्र अधिकारी प्रल्हाद साळुंखे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील, साताऱ्याचे संजय फडतरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, दहिवडी विभाग, कँप वडूज येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. खत निरीक्षक अधिकारी अक्षय सावंत यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट खते आणि कीटकनाशकांचे नमुने विश्लेषणासाठी खत चाचणी प्रयोगशाळा, कोल्हापूर व कीटकनाशक विश्लेषण प्रयोगशाळा, पुणे येथे पाठवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT