सातारा : जिल्ह्यात बनावट खत विक्रीचे रॅकेट सुरू असल्याचे समोर आले असून हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले. वडूज (ता. खटाव) येथे कृषी विभाग तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात 3.7 टन बनावट खते व 200 लिटर बनावट कीटकनाशकांचा साठा पकडला. टाकळवाडी (फलटण) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी येथील बनावट रासायनिक खतप्रकरणी लागलेली लिंक व मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत 25 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत हजारो नव्या व वापरलेल्या रिकाम्या गोणी सापडल्या असून सुमारे 30 लाखांचे बनावट खत विकल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी संशयित प्रतीक काळे (रा. वडूज) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग व पोलिसांनी वडूज येथे
बनावट खते व कीटकनाशके तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. राज्य शासनाचा व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीवरून वडूज (ता. खटाव) येथून प्रतीक काळे याला ताब्यात घेण्यात आले. काळे याने दाखवलेल्या गोदामामध्ये बनावट रासायनिक खते, कीटकनाशक यांचा साठा सापडला. अनुदानित रासायनिक खतांचे पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचे डीएपी (18:16) या खताच्या 90 भरलेल्या गोणी तसेच नाव नसलेल्या सुमारे 390 गोणीचा कच्चा माल डीएपी खत म्हणून वापराच्या उद्देशाने आढळून आला. तसेच म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खताच्या 15 गोणी आढळून आल्या.
बोरिक ॲसिड नॅशनल ॲग्रो हायटेक या कंपनीचे सुमारे 1 मेट्रिक टन रासायनिक खत, क्लोरोपायरीफॉस 10 टक्के दाणेदार कीटकनाशक सुमारे 2.7 मेट्रिक टन, तणनाशक ग्लायफॉसेट 41 टक्के एस. एल. या तणनाशकाचे सुमारे 1 लिटर पॅकिंगमधील 380 बॉटल सापडल्या आहेत. संशयित तणनाशक ग्लायफॉसेट 200 लिटर बॅरलमध्ये आढळून आले. याचा वापर 1 लिटरची पॅकिंग करण्यासाठी करण्यात येणार होता.
उंदिर नाशक झिंक फॉस्फेट सुमारे 12 किलो सापडले असून ते 10 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये तसेच संशयित किटकनाशक अल्युमिनियम फॉस्फाईड 10 ग्रॅम पॅकेटमध्ये 20 किलो आढळून आले. त्याचबरोबर पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड तथा जय किसान कंपनीच्या 18:46 व 10:26:26 या खताच्या नवीन छपाई केलेल्या 1 हजार 580 रिकाम्या गोणी तसेच इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश या खताच्या सुमारे 250 रिकाम्या गोणी आणि इफको को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या 18:46 या खताच्या सुमारे 200 नवीन छपाई केलेल्या रिकाम्या गोणी आढळल्या आहेत. या कारवाईत सुमारे 25.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपसणी करताना कच्च्या मालाच्या सुमारे 1 हजार 980 वापरलेल्या गोणी दिसून आल्या आहेत. त्यामुळे सुमारे 30 लाखांचे बनावट खत संबंधितांनी विकले असल्याचा संशय यंत्रणांना आहे.
दरम्यान, टाकळवाडी (फलटण) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी येथील बनावट रासायनिक खतावरील दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तसेच मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. जिल्हास्तरीय भरारी पथकातील जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे, खटाव कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) के. के. राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे रोहित फारणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक व इतर पोलिस अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुढील तपास करत आहे.