मारूल हवेली : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे चार दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्हातील एका व्यक्तीकडे सुमारे 40 हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. त्याला पकडण्यात यश आले असले तरी त्याचा साथीदार पसार झाला आहे.या संशयीतांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून एकजण अटकेत आहे. ते दोघे संशयीत अहिल्यानगर जिल्ह्यातील असून तेथून बनावट नोटांचे रॅकेट चालवले जात आहे का, याबाबतचा संशय निर्माण झाल्याने मल्हारपेठ पोलिसांसमोर बनावट नोटा तपासाचे आव्हान आहे.
मल्हारपेठ येथे मुख्य बाजारपेठेतील दोन किराणा मालाच्या दुकानात व एका स्टेशनरी दुकानात शंभर रुपये व दोनशे रुपयांच्या नोटा घेऊन खरेदीच्या उद्देशाने दोन व्यक्ती आले होते. मात्र या नोटा बनावट असल्याचे जागरूक व्यापार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्या दोघांना पकडले होते. याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
दरम्यान हा प्रकार पहाण्यासाठी चौकात गर्दी जमल्याने गर्दीचा फायदा घेत त्यातील एकजण पसार होण्यास यशस्वी झाला. तर दुसर्याला स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याच्याकडे सुमारे 40 हजार रूपायांच्या बनावट नोटा आढळून आल्या. अधिक चौकशीतून ते दोघेही अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पिरेवाडी येथील असल्याचे समोर आले आहे. संशयीतांवर गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या संशयीत आरोपीला बुधवारी पाटण न्यायालयात हजर केले असता त्यास दि.25 एप्रिल अखेर पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान संशयीताकडे मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
मल्हारपेठ हे व्यापारी बाजारपेठेचे प्रमुख ठिकाण असून ते पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात येते. काही वर्षापूर्वी देखील येथे बनावट नोटा खपवण्याचा प्रकार घडल होता. नोटाबंदीनंतर नवीन नोटा चलनात आल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक जागरूक व्यापार्यांमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने अनेकांची फसवणूक टळली. तरी यातील काही नोटा चलनात आल्याची शक्यता नाकारता येत नाही बनावट नोटांचे मोठे रॅकेटच कार्यरत असल्याची चर्चा आहे. फरारी संशयीत आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. तसेच ते दोघे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे पोलिस तपासातून समोर आले असले तरी या नोटा त्यांच्याकडे आल्या कशा, नोटांची तस्करी करणार्या संशयीतांनी या बनावट नोटा नेमक्या कुणाकडून घेतल्या होत्या, त्या दृष्टिकोनातून ही मल्हारपेठ पोलिसांनी तपास सुरू केल्याचे समजते.
फरार आरोपीचा तपास सुरु आहे. लवकरच सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समिर शेख यांच्या परवानगीने नगर जिल्ह्यात पोलिस पथक पाठवून फरार आरोपीचा शोध घेतला जाणार आहे.- चेतन मछले, सहाय्यक पोलिस निरिक्षक मल्हारपेठ