सातारा : अमरावती जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट समोर आले असून त्याचे कनेक्शन सातारा जिल्ह्यातील मसूरपर्यंत आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अमरावती पोलिस मसूर पोलिस ठाण्यामध्येही येऊन गेले. काही जणांची झाडाझडती घेण्यात आली. मात्र नेमकी कारवाई काय झाली? याबाबत सस्पेन्स राहिल्याने चर्चेला उधान आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दोन दिवसांमध्ये मसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटांवरून पोलिसांनी अनेकांची झाडाझडती घेतली. अमरावती जिल्ह्यात बनावट नोटा सापडल्यानंतर त्याच्या मुळाशी पोलिस जाऊ लागले. बनावट नोटांचे रॅकेट मोठे निघत ते सातारा जिल्ह्यातील मसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीपर्यंत आले. यामुळे अमरावती पोलिसांनी बनावट नोटांचा फास आवळण्यासाठी मसूर गाठले. यासाठी पोलिसांकडे मदत मागितली. मसूर पोलिसांनी अमरावती पोलिसांच्या हातात हात दिला. काही संशयितांची नावे समोर आल्यानंतर संयुक्तरीत्या पोलिसांनी कारवाई राबवत अनेकांची उचलबांगडी केली.
मसूर पोलिसांसोबत अमरावतीचे पोलिसही आपल्या दारापर्यंत आल्याने बनावट नोटा प्रकरणातील संबंधितांना थंडीत घाम फुटला. पोलिसांनी चालवलेल्या कारवाईचा धुरळा दोन दिवस उडाला. एवढ्या धुरळ्यात मात्र पोलिसांना म्हणे काहीच सापडले नाही. चौकशींच्या नावाखाली दोघांकडेच चौकशी केली आणि अमरावती पोलिस दुसर्या पोलिसांकडे गेले. यामुळे एवढ्या लांबून आलेले पोलिस केवळ चौकशीवरच कसे काय निघून गेले? चौकशी कोणाची झाली? बनावट नोटांमध्ये नेमकी लिंक काय आहे? अमरावती पोलिस जिल्ह्यात दुसरीकडे आणखी कुठे कुठे गेले? अमरावती पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पुन्हा आणखी कोणाची चौकशी झाली का? ती चौकशी, भ्या कोणी दाखवले का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.