सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग म्हसवड येथील सिध्दनाथ यात्रेसाठी सज्ज झाला असून विविध आगारातून सुमारे 108 जादा बसेस विविध मार्गावर सोडण्यात येणार आहेत. याशिवाय फलटण येथील रामरथ यात्रेसाठीही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रा व फलटण येथील रामरथ यात्रा दि. 22 नोव्हेंबरअखेर होत आहे. म्हसवड येथील सिध्दनाथ यात्रेचा शुक्रवार दि. 21 रोजी मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी राज्यासह बाहेरील राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सातारा विभागातील 11 आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेसाठी सातारा 12, कराड 12, कोरेगाव 10, फलटण 12, वाई 10, पाटण 7, दहिवडी 15, महाबळेश्वर 4, मेढा 10, पारगाव-खंडाळा 4, वडूज 12, अशा मिळून 108 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. म्हसवड-सातारा, कराड, पंढरपूर, फलटण, विटा, पुणे, मुंबई या मार्गावर प्रवाशी उपलब्धतेनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दहिवडी आगाराचे आगार व्यवस्थापक कुलदिप डूबल यांची म्हसवड यात्राप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जादा यात्रा वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रक व अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फलटण येथील रामरथ यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार, दि. 21 रोजी आहे. आगार व्यवस्थापक सोफिया मुल्ला यांची यात्राप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फलटण आगारातूनही यात्रेच्या पार्श्वभूमीवर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. भाविकांनी जादा एसटी बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी केले आहे.