चिकन सेंटरमधील स्फोट प्रकरण. Pudhari File Photo
सातारा

सातारा : स्फोटप्रकरणी भावासह दोघांना अटक

arun patil

सातारा : सातार्‍यातील माची पेठ येथील चिकन सेंटरमधील स्फोटप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी मृत्यू झालेल्या मुजमीन पालकर यांच्या भावासह दोघांना अटक केली आहे.

शहीद हमीद पालकर (रा. गुरुवार परज, सातारा) असे भावाचे नाव असून न्यायालयाने त्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आणखी एकाला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे. दरम्यान, स्फोट झालेले घटनास्थळ दुसर्‍या दिवशीही सील ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास सातारा शहर हादरवून सोडणारा प्रचंड मोठा स्फोट झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार दिवाळीसाठी आपटी बार बनवण्यासाठी आणलेल्या फटाक्याच्या दारूमुळे हा स्फोट झाला. यामध्ये मुजमीन पालकर हे जागीच ठार झाले. या स्फोटामध्ये चौघेजण जखमी झाले असून दोघांच्या कानाच्या पडद्याला गंभीर दुखापतही झाली आहे. याशिवाय परिसरातील घरांना तडे जावून अनेक घरांच्या काचाही फुटल्या आहेत.

या घटनेनंतर सुरुवातीला अनेक चर्चांची राळ उडाली. सायंकाळी सहानंतर मात्र पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपास, चौकशीमध्ये मुजमीन याने आणलेल्या फटाक्यांच्या दारुचा स्फोट झाल्याचे समोर आले. स्फोटावेळी प्रत्यक्षदर्शी सुहास हिंदुराव धनसरे (वय 42, रा. गोडोली, सातारा) हे साक्षीदार होते. चिकन सेंटरच्या पाठीमागे लागूनच त्यांचे वाहन सर्व्हिसिंग सेंटर आहे. वाहनांचे काम करत असताना मोठा स्फोट होवून कानठाळ्या बसणारा आवाज त्यांनी ऐकला. याशिवाय धुराचे लोट. ही सर्व घटना त्यांच्यापासून अवघ्या 10 फुटाच्या अंतरावरुन घडल्याने प्रचंड मोठ्या आवाजाने त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे.

स्फोट झाल्यानंतर सर्व्हिसिंग सेंटरमधून ते पळत बाहेर आले. मित्राला फोन लावून घटनास्थळी बोलावून घेतले. तोपर्यंत मुजमीन पालकर हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात व शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे झालेल्या अवस्थेत त्यांनी पाहिले. तक्रारदार धनसरे यांना उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, मुजमीन व शहिद पालकर हे दोघे चिकन सेंटर चालवत होते. बुधवारी दुपारी मुजमीन हे चिकन सेंटरमध्ये एकटे असताना कोणतेतरी स्फोटके ठेवली होती. त्याचा स्फोट होवून ही दुर्घटना घडली आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यात स्फोटकाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मृत मुजमीन याचा भाऊ शहिद याला अटक केली. शहिद याला स्फोटकाबाबत माहिती होती. ती माहिती त्याने पोलिसांना न सांगितल्याने अनर्थ घडला. तो चालवत असलेल्या चिकन दुकानात हा स्फोट झाल्याने त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला पोनि राजेंद्र मस्के यांनी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दुसरा संशयित गुरुवार परज येथीलच

गुरुवारी तपासामध्ये आणखी एकाचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. शहर पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयित हा गुरुवार परज येथील असून, आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT