फलटण : फलटण शहराजवळील जाधववाडी परिसरातील माजी सैनिक शिवाजी मुगुटराव बुधावले (वय ६१) हे दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या गळ्याला चायना मांजा लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेत त्यांच्या गळ्यावर खोल जखम होऊन आठ टाके पडले आहेत.
बंदी असलेल्या चायना मांजाचा फलटण शहरात सर्रास वापर होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. बंदी असूनही चायना मांजा खुलेआम विक्री व वापर सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवर्षी चायना मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असतानाही काही पतंगप्रेमी जीवघेण्या मांजाचाच वापर करत आहेत. प्रशासनाकडून जनजागृती व कारवाई केली जात असली तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेनंतर फलटण परिसरात चायना मांजाविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बंदी असलेल्या मांजाची विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पतंगोत्सवाचा आनंद साजरा करताना दुसऱ्याच्या जीवाशी खेळ होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. सुरक्षित सुती मांजाचा वापर करूनच पतंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.