कराड : एपिस्टन फाईल्स ओपन झाल्यानंतर भारतात राजकीय धमाका होणार. मराठी माणूस पंतप्रधान होणार, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याच गोष्टीचा पुनरुच्चार त्यांनी शुक्रवारी पुन्हा केला. अमेरिकेत सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत ही माहिती बाहेर पडेल. म्हणजेच भारतात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 1 वा. च्या सुमारास ही माहिती कळेल आणि राजकीय भूकंप होईल, असा दावाही त्यांनी केला.
देशभर चर्चेत आलेल्या एपिस्टन फाईल्सबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, वीस दिवसांपूर्वी कराडमध्ये मी ही माहिती दिली होती. यानंतर संबंध देशात एपिस्टन फाईल्सबाबत चर्चा सुरू झाली. यावेळी काहींनी माझ्यावर आरोप केले. राजकारणात असे आरोप सहन करावे लागतात. एक गोष्ट चांगली झाली, संबंध देशात एपिस्टन फाईल्स काय आहे हे लोकांच्या लक्षात आले आहे. हा अमेरीकेच्या संसदेचा कायदा आहे.
जगातील कोणतीच ताकद आता ही माहिती बाहेर प्रकट होण्यापासून थांबवू शकत नाही. अमेरीका संसदेचे कायदे फार कडक आहेत. त्यामुळे ही माहिती जाहीर होणारच. 300 जीबी डेटा आहे. डाऊनलोड करायला किती वेळ लागेल माहिती नाही. अमेरीकेमध्ये नऊ किंवा दहा वाजता ही माहिती बाहेर पडण्यास सुरूवात होईल. भारतात शुक्रवारी मध्यरात्री नंतर 1 वा. च्या सुमारास ही माहिती मिळेल. माहिती उपलब्ध झाल्यानंतर मी यावर अधिक सविस्तर बोलेन, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.