सातारा

Shivendraraje Bhosale | दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्क सुरळीत ठेवा : ना. शिवेंद्रराजे

प्रशासन, विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध भागात, विशेषकरुन दुर्गम डोंगराळ भागामध्ये मोबाईल नेटवर्क नेहमीच विस्कळीत होत असते. अनेक ठिकाणी तसेच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोबाईलला रेंजच नसते त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासन आणि मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन दुर्गम-डोंगराळ भागातील मोबाईल नेटवर्क सेवा कायम सुरळीत राहील, अशी ठोस उपाययोजना तातडीने करावी, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.

सातारा-जावली तालुक्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दुर्गम-डोंगरी भागामधील अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क सेवा अनियमित, अपुरी व विस्कळीत असल्यामुळे स्थानिक नागरिक, विध्यार्थीं, शेतकरी, व्यावसायिक यांच्यासह पर्यटक यांची मोठी गैरसोय होते, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सूचनेनुसार व अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य अजित साळुंखे, दिलीप बाबर, सातारा पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी इनामदार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, बीएसएनएल, रिलायन्स- जिओ, वोडाफोन- आयडिया या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सातारा-जावली तालुक्यातील ठोसेघर, परळी विभाग, रांजणी, मार्ली, बामणोली विभाग, खटाव तालुक्यातील मांजरवाडी, डिस्कळ आदी भागांमध्ये मोबाईल नेटवर्क नसणे ही मोठी गंभीर समस्या आहे. ज्या ठिकाणी मोबाईलला रेंज नाही त्या ठिकाणच्या लोकांना दैनंदिन संपर्कामध्ये अडथळे होत आहेत. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे, ऑनलाईन शासकीय सेवा, शैक्षणिक कामकाज, डिजिटल व्यवहार करणे अशक्य आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत ना. शिवेंद्रराजे यांनी उपस्थितांकडून आढावा घेतला. जिथे नेटवर्क नाही अशा भागांमध्ये नेटवर्क कव्हरेज वाढवणे, नवीन मोबाईल टॉवर उभारणे तसेच बंद अथवा कमी क्षमतेचे टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे तसेच आवश्यक तांत्रिक उपाययोजना करणे यावर लक्ष केंद्रित करून मोबाईल सेवा सुरळीत राहण्यासाठी तातडीने ठोस पावले उचला, अशा सक्त सूचना ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT