Satara Encounter: एन्काऊंटरमधील मृताचे पुण्यात शवविच्छेदन Pudhari
सातारा

Satara Encounter: एन्काऊंटरमधील मृताचे पुण्यात शवविच्छेदन

सातारच्या दोन्ही जखमी पोलिसांवर शिक्रापूर येथे उपचार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा पोलिसांनी शिक्रापूर, जि. पुणे येथे शनिवारी गुन्हेगार लखन भोसले याचा खात्मा केला होता. त्याच्या मृतदेहाचे रविवारी दिवसभर ससून हॉस्पिटल, पुणे येथे शवविच्छेदन सुरू होते. सातारा पोलिसांनी मृत लखनच्या साथीदारावर हाफ मर्डर व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एन्काऊंटरवेळी जखमी झालेले सुजित भोसले व तुषार भोसले यांच्यावर शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातार्‍यात कोयता गँगने महिलांचे मंगळसूत्र कोयता दाखवून चोरण्याचा सपाटा लावला होता. त्यांचा शोध घेताना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस आणि चेन स्नॅचिंगमधील संशयित लखन ऊर्फ महेश पोपट भोसले (वय 32, रा. जयरामस्वामी, वडगाव, ता. खटाव), अमर धुलाप्पा केरी यांच्याबरोबर शनिवारी शिक्रापूर जि. पुणे येथे चकमक झाली. यात लखनचा एन्काऊंटर झाला तर अमरला पोलिसांनी जेरबंद केले होते.

एन्काऊंटरनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. शनिवारी मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. रविवारी दिवसभर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. सोमवारी भोसले यांच्या कुटुंबीयांना मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. जखमी पोलिस सुजित भोसले यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात लखन भोसले याचा साथीदार अमर केरी याच्याविरुद्ध हाफ मर्डर व शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमान्वये तक्रार दिली आहे.

संपूर्ण बॉडीचे स्कॅनिंग...

लखन भोसले याला गोळी लागल्याने व त्याचा मृत्यू झाल्याने नियमानुसार शवविच्छेदन केले जात आहे. शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाचे संपूर्ण स्कॅनिंग करणे, मृताच्या शरीरावरील सर्व खुणा, त्यावरील कपडे, सॅम्पल घेणे अशी प्रक्रिया सुरू होती. तसेच वर्ग 1 चे महसूल विभागाचे अधिकारी व इतर शासकीय पंच उपस्थित होेते. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया झाल्यानंतर इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT