सातारा : राज्य शासनाने सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात छत्रपतींची बदनामी रोखण्यासाठी विशेष कायदा करावा. छत्रपतींचा इतिहास शासनाने खंड स्वरूपात प्रकाशित करावा तसेच सिनेमॅटिक लिबर्टीवर इतिहासकारांची समिती नेमावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम विरोधकांसह सरकारने दाखवून द्यावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले. इतर धर्मियांची धर्मस्थळे उद्ध्वस्त करणार्या औरंगजेबाची कबरही उखडून टाका, असा आक्रमक पवित्राही उदयनराजेंनी घेतला. उदयनराजेंच्या या इशार्याने महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, प्रत्येक वेळी शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कोणीही उठतो आणि काहीही वक्तव्य करतो. प्रत्येकवेळी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले जाते. पक्ष किंवा राजकीय संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच प्रत्येक गोष्टीची सुरुवात करतात. त्यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह विधान लोकांना चांगले वाटते का? वैयक्तिक स्वार्थ किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांची अवहेलना केली जात असेल तर लोक गप्प बसणार नाहीत. वादग्रस्त वक्तव्यावर चौकशी करू असे दिले जाणारे आश्वासन आता बस्स झाले!
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात विशेष कायदा पारीत करावा. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्याचे कुणी धाडस करणार नाही, असा कायदा केला पाहिजे. अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, दहा वर्षे शिक्षा व जास्तीत जास्त दंडाची तरतूद या कायद्याखाली करावी. या प्रकरणी डीवायएसपी दर्जाचा अधिकारी हा चौकशी अधिकारी असावा. चार्जशिट 30 दिवसांत सादर करावी. फास्ट ट्रॅकवर खटला सुरू करून सहा महिन्यांत निर्णय झाला पाहिजे, असेही खा. उदयनराजे म्हणाले.
खा. उदयनराजे पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधींकडून अवमानकारक वक्तव्य झाल्यास त्याच क्षणी त्याला अपात्र करण्याची तरतूद या कायद्यात करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राज्याचा कारभार करत असाल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन याच अधिवेशनात कायदा पारीत करावा. विधानसभा सभागृहातील सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासनमान्य इतिहास खंड स्वरूपात प्रकाशित करावा. त्यामुळे वाद-विवाद संपुष्टात येतील. जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर नाटक, चित्रपट काढण्याबाबत कायद्यात तरतूद करावी. राज्यासह देशातील अनेक घराण्यांनी आयुष्य वेचले आहे. मात्र एखाद्या काल्पनिक कादंबरीवरीवरून चित्रपट दाखवला जातो त्यावेळी इतिहासकारांची समिती असावी. चित्रपट, नाटकाची स्क्रिप्ट या समितीला सादर करून तिच्यामध्ये खरे-खोटे काय आहे याची शहानिशा झाली पाहिजे. मात्र, अशी पध्दत नसल्यामुळे तेढ निर्माण होते. शिर्के कुटुंबियांनी माझी भेट घेतली. छावा चित्रपटात शिर्के कुटुंबियांनी छ. संभाजी राजांना पकडून दिले असे दाखवले असले तरी इतिहासात तशी कुठे नोंद नाही. तसे असते तर पुढे सोयरिक झाली असती का? असाही सवाल खा. उदयनराजेंनी केला. चित्रपट, नाटकवाले तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याने याच अधिवेशनात कायदा होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
हा कायदा करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे का, असे विचारले असता खा. उदयनराजे भोसले म्हणाले, त्यांनी कायदा केला नाही तर लोक त्यांना जाब विचारतील. त्यांनी हा कायदा केलाच पाहिजे. कायदा करायचा नसेल तर निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊच नका. शिवाजी महाराज कोण होते हे माहित नाही, कायदा करणार नाही असे त्यांनी जाहीर करावे. त्यानंतर लोक मंत्र्यांना त्यांची जागा दाखवतील. त्यांना कायदा करावाच लागणार. कायदा न केल्यास त्यांचे महाराजांवर बेगडी प्रेम आहे हे स्पष्ट होईल. भाजप, काँग्रेस, शिंदे गट, अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गटाने एकमताने हा कायदा करावा. कायदा न करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. राजेशाही काळात कडेलोट उगीच केले जात नव्हते. विकृत लोकांची नसबंदी केली पाहिजे. कायदा केल्यावर विकृत लोकांची आपोआपच नसबंदी होणार आहे, असेही ते म्हणाले.
औरंगजेबाचे उदात्तीकरण होत असून त्याच्या कबरीला केंद्र सरकार निधी देत असल्याचा हिंदू जनजागरण समितीने दावा केला आहे, याकडे लक्ष वेधले असता खा. उदयनराजे म्हणाले, औरंगजेब हा देव नव्हता. हे सर्वजण परकीय आक्रमक होते. त्याचे काही योगदान नाही. तो इथला नव्हता, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांची मंदिरे, मस्जिद इतर धर्मस्थळे जपण्याचे काम केले. मात्र औरंगजेबाने याउलट केले. त्यामुळे त्याची कबर ठेवण्यात काय अर्थ आहे? हिंदू-मुस्लिम हा विषय नसून औरंगजेब हा चोर, लुटेरा होता. बाहेरून आलेली ही लोकं आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केनेडी म्हणाले होते, कितीही संरक्षण असले आणि एखाद्याने मेलो तरी एखाद्याला खल्लास करण्याचे ठरवले तर.. ही वेळ येऊ देऊ नका. ज्यांची नितीमत्ता भ्रष्ट झाली आहे त्यांना हे विधान लागू होते, असेही खा. उदयनराजे म्हणाले.