सातारा : सातारा शहरातील प्रवेशद्वाराजवळ परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याने शहराची प्रवेशद्वारे कचऱ्याचे अड्डे बनले आहेत. याकडे ग्रामपंचायतीसह नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच बकाल स्वरूप आले आहे. पालिका प्रशासन व शहरालगतच्या ग्रामपंचायतींनी कचरा टाकणाऱ्यावर ठोस कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
कठोर कारवाईची गरज...
कचरा उन्हामुळे सडू लागला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच डास व माश्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी व नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्रशासनाच्या बैठका फक्तकागदावरच...
जिल्हा प्रशासनाने नगरपालिका व शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बैठकीत प्रशासनाने कारवाईबाबत ग्रामपंचायतींना सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरालगतच्या ग्रामपंचायतींनी कारवाईचा धडाकाही सुरू केला. त्यानंतर नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकण्याबाबत कारवाईमुळे धसका घेतला होता. मात्र जिल्ह्यात पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती पहावयास मिळत आहे. प्रशासनाने फक्त कागदावरच बैठका घेतल्या की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यासाठी प्रशासनाने पुन्हा कारवाईचा धडाका सुरू करुन उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.
अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी...
वर्ये नदी पूल परिसर, सैदापूर परिसर, वाढेफाटा वेण्णा नदी पूल परिसर, आदर्शनगरी परिसर, ठक्कर सिटी परिसर, महावितरण कार्यालय परिसर कृष्णानगर, माहुली नदी पूल परिसर, अजंठा चौक, शिवराज पेट्रोल पंप परिसर यासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडले आहेत. त्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप आले आहे. कचरा अस्ताव्यस्त पडल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.