Election campaign Pudhari
सातारा

Election campaign: प्रचारांसाठी कार्यकर्त्यांकडून अलिशान वाहनांची मागणी

वाढत्या तापमानाचा उमेदवारांना फटका : रणधुमाळी अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 65 गटात व पंचायत समितीच्या 130 गणांमध्ये प्रचाराची चांगलीच रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्या तरी गेल्या काही दिवसांत प्रचारासाठी अलिशान वाहनांनाच मागणी राहिली. प्रचारासाठी कार्यकर्त्यांना गावोगावी फिरण्यासाठी अलिशान वाहनांची मागणी वाढली होती. त्यामुळे गावोगावी अलिशान वाहनांनी चांगलीच भाव घेतला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. सगळेच पक्ष जोरदार कामाला लागले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मनात पक्षाबद्दल निष्ठा असणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.

मात्र कार्यकर्त्यांकडून उमेदवारांकडे अलिशान वाहनांची मागणी होवू लागली आहे. प्रचारासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्याने उमेदवारही कार्यकर्त्यांच्या मागण्या पुरवू लागले होते. उमेदवारांनी वातानूकुलित स्कॉर्पिओ, इनोव्हा, बलेरो, बलेनो, ट्रॅक्स, ब्रीझा, इर्टिका एसयुव्ही यासह नामवंत ब्रॅन्डच्या गाड्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांचा ताफा गावोगावी फिरताना दिसत आहे.

गावोगावी शक्तीप्रदर्शने...

गट गणातील गावोगावी शक्तीप्रदर्शन, उमेदवारांचा दरारा दाखवणे कमी वेळात जास्त ठिकाणी पोहोचण्यासाठी या गाड्यांचा वापर होत आहे. खाण्या पिण्याच्या बडदास्तीसह अलिशान वाहनांसाठी देखील उमेदवारांना खर्च करावा लागत आहे. मात्र उमेदवारही कार्यकर्त्यांची बडदास्त राखण्यात मागेपुढे पहात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र कार्यकर्तेही गट व गणांमध्ये जोमाने प्रचाराला लागले आहेत. गावोगावी दुचाकी वाहनासह अलिशान वाहनाची रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. त्यामुळे जो तो उमेदवार आपल्या पाठीमागे किती शक्ती आहे हे दाखवून देत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT