Eknath Shinde Pudhari
सातारा

Eknath Shinde | महाबळेश्‍वरच्‍या पर्यावरणाची हानी खपवून घेणार नाही : ना. एकनाथ शिंदे

गोल्फ कोर्स वृक्षतोड प्रकरणावर नाराजी

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर येथील ‘द क्लब’च्या गोल्फ कोर्स मैदानावरील कथित बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे. महाबळेश्वरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यावरणाची हानी करणारे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.

पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्‍वरच्या निसर्ग व पर्यावरणाची हानी करणाऱ्यांची कुणाचीही गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

महाबळेश्वर शहरातील हेरिटेज (वारसा स्थळ) ग्रेड-१मध्ये समाविष्ट असलेल्या ‘द क्लब महाबळेश्वर’च्या सिटी सर्व्हे क्रमांक ११७ व ११८ मधील गोल्फ कोर्स मैदानात विनापरवाना वृक्षतोड झाली. या प्रकरणी पालिकेचे वृक्षाधिकारी कल्याण हिवरे यांच्या तक्रारीवरून ‘द क्लब’च्या अध्यक्षा मनीषा गोखले-शहा, सचिव लेफ्टनंट कर्नल (नि.) गौतम नंदी आणि सुहास पार्टे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये हेरिटेज ग्रेड-१ मिळकतीत उत्खनन, वृक्षतोड, शेड उभारणी तसेच रस्त्याची कामे झाल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या पातळीवर सुरू असलेल्या कारवाईमुळे ‘द क्लब’ व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, या प्रकरणाकडे महाबळेश्वर नगरपरिषद आणि महसूल प्रशासनाने केलेल्या कथित दुर्लक्षाबाबतही चर्चा सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट कारवाईचे आदेश दिल्याने स्थानिक प्रशासन पुढील काळात कोणती पावले उचलते, याकडे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT