Eknath Shinde Pudhari
सातारा

Eknath Shinde | मी गावी आलो की विरोधकांना पोटदुखी : ना. एकनाथ शिंदे

माझा प्रत्येक दौरा राज्याच्या कामासाठीच

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : मी गावी आल्यावर काही विरोधकांच्या पोटात दुखते. त्यामुळे या पोटदुखीवर औषध म्हणून शेतात आणखी काही औषधी वनस्पती लावणार आहे. गावी गेलो, दिल्लीला गेलो किंवा लंडनला गेलो तरी विरोधक टीका करतात. मात्र, माझा प्रत्येक दौरा हा राज्याच्या कामासाठीच असतो. लंडन दौऱ्यात महाराष्ट्राची अस्मिता, मराठीचा डंका आणि राज्यातील शासकीय योजनांचे ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर केले. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला फार महत्त्व देत नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.

ना. एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे दोन दिवसांच्या मुक्कामी आले आहेत. जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधून त्यांनी शुक्रवारी आपल्या शेतामध्ये बांबूची लागवड केली. दरवर्षी गावी आल्यानंतर शिंदे आपल्या शेतात विविध फळझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करतात. यंदा त्यांनी प्रथमच सफरचंदाची लागवड केली. बांबू लागवडीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ना. शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. निधीवाटपावरून नाराजी असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण केवळ गणेशोत्सवासाठी गावी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने मोठा खंड दिल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याची वस्तुस्थिती शिंदे यांनी मान्य केली. धाराशिव जिल्ह्यातील परिस्थितीबाबत पालकमंत्री, खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त भागांमध्ये ५ तारखेपासून पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचा निर्णयही सरकारच्या वतीने घेतला जाईल. अतिवृष्टी असो किंवा दुष्काळ, शासन बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. संपूर्ण ताकदीने सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई निश्चितपणे दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दौरा करत असून, आपणही लवकरच या भागाचा पाहणी दौरा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर कामातूनच दिले जाईल. शेतकऱ्यांना थेट मदत करून सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT