सातारा : साताऱ्यात जी घटना घडली, त्या घटनेचे काहीजणांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण आ. शशिकांत शिंदे यांनी सत्याची बाजू घेतली. ‘शिंदे किसी से डरते नही और मैदान छोड के भागते नही..’ हे त्यांनी दाखवलं, अशा शब्दांत आ. शशिकांत शिंदे यांचे दिलसे कौतुक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नथीतून तीर मारला.
निमित्त होतं विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या आमदारांच्या निरोप समारंभाचे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच ना. एकनाथ शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर स्तुतिसुमने वाहताना ‘मुसाफिर है हम भी... मुसाफिर हो तुमभी... हर मोड मुलाकात होती रहेगी’, अशा शायरीतून आपल्या मनातील भावना व्यक्त केली.
ना. एकनाथ शिंदे म्हणाले, शशिकांत शिंदे हे विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यांचा आणि माझा जन्म एकाच मातीमधील आहे. त्यात दोघेही शिंदे... त्यामुळे आमचं नातं तसं गावकीचं, भावकीचं आहे. साताऱ्याची माती झुंज करायला, लढायला शिकवते. कामगार चळवळ असो, माथाडी कामगारांचे प्रश्न असो, शशिकांतजी, आपण नेहमीच अग्रभागी राहिला आहात. सर्वसामान्यांच्या लढ्यात कायम पुढे राहिला आहात. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जीवाचे रान करणारा गडी, अशी तुमची ओळख आहे.
शशिकांत शिंदेंसारखा लढणारा नेता सभागृहाची शान
शशिकांत शिंदेंसारखा लढणारा नेता सभागृहाची शान आहे. शशिकांतरावांचे मित्रमंडळ मोठं आहे. त्यामुळे त्यांना मित्रसंपदा मंत्री म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते यापूर्वी मंत्री होतेच. विधान परिषदेतून ते निवृत्त होत असले तरी शशिकांतजी एका पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यामुळे सभागृहात नसला तरी तुमच्याशी कोणत्या तरी कारणांनी आपले संबंध येतच राहतील, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.