सातारा : साताऱ्याची भूमी स्वाभिमानाची आहे. शूरवीरांची आहे. साताऱ्याची जनता खालच्या दर्जाचे राजकारण सहन करत नाही. कार्यकर्त्यांवर संकट आले तर मी त्यांच्या पाठीमागे उभा राहणारच. झुकणार नाही, लढणार. मात्र अन्याय सहन करणार नाही. साताऱ्यात जे झाले त्यावर मी योग्यवेळी बोलेनच. मी हिशेबाला चोख आहे, तो चुकता करणारच. ‘मै किसीको छेडता नहीं, और मुझे छेडा तो छोडता नहीं’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावरून एल्गार पुकारला.
साताऱ्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तानाट्यानंतर प्रथमच शिंदे शहरात आले होते. त्यांच्या हस्ते शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांचे सत्कार झाले. व्यासपीठावर पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आ. सुहास बाबर, रवींद्र धंगेकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक- निंबाळकर, शरद कणसे, हणमंतराव जगदाळे, रणजितसिंह भोसले, राजेंद्रसिंह यादव, राजाभाऊ बर्गे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचे दाखले देऊन शिंदे म्हणाले, मी जिल्ह्यातील विकासकामांना अजिबात निधी कमी पडू देणार नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कुणीही झाला असला, तरी जनतेच्या मनातला अध्यक्ष शिवसेनेचा आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आलो नाही तर भूमिपुत्र म्हणून इथे आलो आहे. सत्ता येते आणि जाते, पण नाव गेले की परत येत नाही. चढ-उतार, दु:ख, संघर्ष यातून मी उभा राहिलो आहे. मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत मी 567 निर्णय घेतले. हे निर्णय कुणीही बदलू शकत नाही. निवडणूक काळात जे बोललो, ते पूर्ण केले आहे.
कार्यकर्त्यांच्या मागे त्यांच्या संकटकाळात उभे राहायचे असते. कार्यकर्त्यांवर वेळ आल्यानंतर, त्यांचे अपमान झाल्यानंतर मी सहन करत असेल तर मी कसला शिवसैनिक? मी लढणारा आहे, झुकणारा नाही. कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणार. खालच्या दर्जाचे राजकारण जिल्ह्यात झाले; पण जिल्ह्यात वेडेवाकडे काही खपत नाही. हा जिल्हा शांत आहे; पण सातारची जनता चुकीचे सहन करत नाही. साताऱ्यात जे घडले त्यावर मी योग्यवेळी बोलेन. ‘मै किसीको छेडता नहीं, और किसीने मुझे छेडा तो छोडता नहीं’, मी कुणाच्या आडव्यात जात नाही. माझ्याही आडव्यात कुणी जाऊ नये, असा इशाराही शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता दिला.