सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीप्रकरणामध्ये मीदेखील साक्षीदार आहे. जिल्हा परिषदेतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना मतदानापासून वंचित ठेवले जात असल्याची तक्रार ना. शंभूराज देसाई आणि ना. मकरंद पाटील या दोघांनीही माझ्याकडे केली होती. मी साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांना फोनवरुन सदस्यांना मतदानाचा हक्क बजावू द्या, नंतर काय कायदेशीर कारवाई करायची ते करा, असे सांगूनही त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवून प्रशासनाने लोकशाहीचा खून केला आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला.
सातारा जिल्हा परिषदेत तीन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ना. शिंदे विधीमंडळात बोलत होते. ते म्हणाले, या सभागृहामध्ये अर्जुन खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घटना मांडली, त्याचा मीदेखील साक्षीदार आहे. ही निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली तेव्हा दोन मतदारांवर कधी काळातला गुन्हा दाखल केला, आणि त्यांना ॲरेस्ट केले गेले, अशी माहिती ना. शंभूराज देसाई यांनी मला दिली होती. त्यानंतर मी सातारा जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी यांना फोन केला. त्यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगिलते. तेव्हा मतदानापासून या सदस्यांना वंचित ठेवू नका, असे सांगितले. त्यावर सदस्यांना मतदान करु दिले जाईल, असे एसपी म्हणाले, कोणालाही वंचित ठेवणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. तसेच या प्रकरणात शहानिशा करुन कारवाई करावी. डीजींना फोन करुनही मी ही माहिती दिली होती.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मते कमी करण्यासाठी विजय मिळवण्यासाठी असा प्रकार होवू शकतो. डीजींनी एसपींना फोन केल्याचे सांगितले. तरी देखील सदस्यांना गेटवर थांबवण्यात आले. मतदान झाल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या सदस्यांवर कारवाई करणे गरजेचे असताना, त्यांना मतदान करु दिले गेले नाही. मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून आहे. तो गुन्हा देखील आहे, असेही ते म्हणाले.