सातारा : कूपर कंपनीचे ट्रॅक्टर युनिट सातार्यात सुरू झाले असून सातार्यातील रस्त्यावर आता फक्त कूपर समूहाचे ट्रॅक्टर दिसतील. कूपर कंपनीचे इंजिन हे देशात सर्वत्र पोहचले आहे. कूपर समूह सातार्यात आहे याचा खूप अभिमान आहे. कूपर आणि राजघराणे यांचे संबंध जुने आहेत. सातारा एमआयडीसी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
कूपर उद्योग समूह ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्र पदार्पण प्रकल्प शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई, कूपर उद्योग समुहाचे अध्यक्ष फरोख कूपर, कूपर उद्योग समूह संचालिका माहरोख कूपर, अॅड. मनीषा कूपर, क्लाइव बॅगनॉल, नंदू रांगणेकर, बेहराम आर्देशीर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरिष पाटणे, सूर्याजी स्वामी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, कूपर कंपनीमुळे सातारचे नाव फॉरेनला पोहचले आहे. मेक इन इंडियामुळे रोजगार वाढले आहेत. सातारा एमआयडीसी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 2029 ला विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना होणार असून सातार्यातील काही भाग कोरेगाव मतदार संघाला जोडला जाऊ शकतो. त्यामुळे मी आणि महेश शिंदे दोघे मिळून एमआयडीसी वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. एमआयडीसीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योगमंत्री उदय सामंत सकारात्मक आहेत. ना. महेश शिंदे म्हणाले, जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण कूपर कुटुंब आहे. जिल्ह्याला स्वाभिमान आणि अभिमानाचा आजचा दिवस आहे. आज ट्रॅक्टर सेक्टरमध्ये सर्वात नंबर वनचे इंजिन कूपर समुहाचे आहे. यापुढे कूपर समुहाला लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
फरोख कूपर म्हणाले, माझे स्वप्न होते ट्रॅक्टर तयार करायचे ते आज पूर्ण झाले आहे. माझे शेतीमध्ये शिक्षण झाले आहे. मातोश्रींनी कारखाना चालवायला लागेल असे मला सांगितले. त्यानंतर कारखान्याचा अनुभव घेण्यासाठी लंडनला गेलो. फौंड्री चालवायला शिकलो. प्रत्येक वर्षी 75 हजार टन माल कूपर समूहात बनवला जात आहे. सातारच्या माणसात कलर भरपूर आहेत. कूपरचे इंजिन मोठ्या प्रमाणात डिफेन्सला जात आहे. जपानला इंजिन गेले असून आता ट्रॅक्टर जपानला एक्सपोर्ट करायची ऑर्डर आली आहे. माझ्या जीवनात आई आणि पत्नीने मला खूप संरक्षण दिले असल्याचे त्यांनी सांगितले.