सातारा

डोंगर दर्‍यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

Arun Patil

पाटण : पाटण तालुक्यात शिक्षण क्षेत्रात राजकारण घुसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे पहायला मिळत आहे. गावागावांत गटातटाच्या राजकारणामुळे भावी पिढ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. डोंगर कपारीत राहणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून जनावरे संभाळण्याचा पर्याय स्वीकारल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कराटे येथील जिल्हा परिषद शाळा त्यातीलच एक.

प्रशासकीय अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे काही प्राथमिक शाळांची दयनिय अवस्था झाली आहे. परिस्थिती सुधारली गेली नाही तर कराटे प्राथमिक शाळेप्रमाणे अन्य प्राथमिक शाळांना स्थानिक टाळे ठोकतील, अशी परिस्थिती आहे.

जग चंद्रावर आणि पाटण तालुक्यातील भावी पिढी जनावरांच्या पाठीमागे डोंगरावर, अशी अवस्था भविष्यात येथे पहायला मिळाली तर याला सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार असेल असे भीषण वास्तव सध्या अनुभवायला मिळत आहे.

तालुक्यात कोयना विभागातील कराटे प्राथमिक शाळेला शिक्षकांअभावी शैक्षणिक धोरणांच्या विरोधात स्थानिकांनी शाळेलाच टाळे ठोकले. वर्षानुवर्षे स्थानिक शिक्षकाची गैरहजेरी, उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांची कमी झालेली पटसंख्या, शाळा सोडून अन्य शाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाळाच बंद पडतेय की काय अशी परिस्थिती आहे.

तालुक्यातील शैक्षणिक वातावरण दूषित झाले आहे. कराटे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. उपशिक्षक पाच वर्षापासून गैरहजर आहेत. लोकसहभातून लाखो रुपये खर्च करून शाळा उभारण्यात आली मात्र तेथे शिक्षकच नाहीत. एक शिक्षक गैरहजर असताना शासनाचा पगार घेतो. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी शिक्षण विभाग त्यालाच पाठीशी घालत आहे, असे ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.

दुसरा शिक्षक अधिकार्‍यांचे ऐकत नाही. 2018 पासून ग्रामस्थांच्या मागणीला अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकार्‍यांपर्यंत पाठपुरावा केला गेला पण काही उपयोग झाला नाही. 4 शिक्षकांची शाळा एका शिक्षकावर चालते. 95 पटसंख्या असणारी शाळा 55 पर्यंत खाली आली. पुढील वर्षी आणखी गळती वाढत जाईल. एका शिक्षकासाठी 90 मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लावले जाते.

एका महिन्यात दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भेटूनही ग्रामस्थ भेटलेच नाहीत असे अधिकारी चुकीचे सांगत आहेत. यामुळे स्थानिकांचा अधिकार्‍यांवरील विश्वास उडाला आहे.

तालुक्यातील शैक्षणिक वातावरण खराब…

ऑनलाइनवरून संबंधित शिक्षक जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शाळेचे टाळे काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर शाळेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा कराटे ग्रामस्थांनी दिला आहे. अधिकारी शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पुढार्‍यांकडे जाण्याचा सल्ला देत आहेत. शिक्षण क्षेत्रातील अशा अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील शैक्षणिक वातावरण खराब झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT