सातारा : परीक्षा आणि कॉपी हे जणू एकमेकांना घट्ट बिलगलेले शब्द. पण गेल्या वर्षी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने या कॉपीला परीक्षेपासून दूर सारण्यात यशस्वी वाटचाल केली. आता या यशाला केवळ प्रशासकीय आकडेवारीपुरते मर्यादित न ठेवता, त्याला शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक मूल्यांच्या भावनिक जोड देण्यासाठी कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी तयार केलेल्या अनोख्या बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या महिनानिहाय वार्षिक नियोजन पुस्तिकेचे प्रतिनिधिक वाटप जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींना करण्यात आले.
या पुस्तिकेच्या निर्मितीत आणि वितरणात सर्व मुख्याध्यापक संघांनी दिलेले योगदान हे शैक्षणिक बांधिलकीचे प्रतीक आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघांच्या सहकार्याने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यांनी छपाईसाठीही सक्रिय योगदान दिले आहे. या पाचही जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ती मोफत वितरित करण्यात येणार आहे. ज्यामुळे शिक्षणाचा हा राजमार्ग प्रत्येक शाळेसाठी उपलब्ध होईल. सचिव सुभाष चौगुले यांनी हा उपक्रम एका निरंतर प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘या वर्षीच्या अंमलबजावणीतून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे, पुढील वर्षी ही पुस्तिका आणखीन दर्जेदार आणि समृद्ध बनवण्यात येईल.
याप्रसंगी, नूतन उपसंचालिका प्रभावती कोळेकर यांचा एसएससी बोर्डाच्यावतीने अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोहळ्याला सातारा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी शिवाजी मलदोडे, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलावडे, चंद्रकांत जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.