मायणी /खटाव : सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मायणी मेडिकल कॉलेजमध्ये देशमुख यांच्या कार्यकाळात बोगस कागदपत्रांच्या आधारे तसेच आर्थिक देवाणघेवाणीतून एमबीबीएसचे प्रवेश झाल्याचे प्रकरण ‘ईडी’कडे दाखल आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे ‘ईडी’च्या पथकाने देशमुख कुटुंबीयांच्या मायणी येथील घरावर धाड टाकल्याने तालुक्यात खळबळ उडाली. ‘ईडी’ची धाड नेमकी कोणत्या तपासासाठी टाकली याबद्दल पथकाने काहीच माहिती दिली नसल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
‘ईडी’ने यापूर्वी मायणी मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन संचालक मंडळात असलेले एम. आर. देशमुख व आप्पासाहेब देशमुख यांना अटक केली आहे. मायणी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून पैसे घेवून त्यांची बोगस कागदपत्रे तयार करुन अॅडमिशन न दिल्याने देशमुख यांच्याविरोधात तक्रारी दाखल होत्या. याच प्रकरणाचा वाढीव तपास गेली 2 वर्षे सुरु आहे. याच कालावधीत कोविड काळात आ. जयकुमार गोरे यांच्या कालखंडात याच मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये मृत रुग्णांना जिवंत दाखवून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करुन त्यासंबंधीची याचिका दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मायणी मेडिकल कॉलेजचे माजी व्हा. चेअरमन दिपक आप्पासाहेब देशमुख व आ. जयकुमार गोरे यांच्यात मेडिकल कॉलेजवरुन वाद सुरू आहेत. विधानसभेच्या अधिवेशनातही यावरुन रणकंदन झाले आहे. देशमुख - गोरे यांच्यातील हा वाद विकोपाला गेला असतानाच गुरुवारी रात्री मायणी येथील हिम्मत देशमुख व दिपक देशमुख यांच्या घरी ईडीची धाड पडली. देशमुख यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले. यामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात खळबळ उडाली. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर त्यांच्या घराची तपासणी सुरू होती. देशमुख कुटुंबीयांच्या घरी ईडीचा छापा पडल्याने एक किलोमीटरचा परिसर पूर्णतः सिल करण्यात आला होता. कोणीही खाजगी व्यक्ती या परिसरात जाऊ शकत नव्हती. केंद्रीय सुरक्षा दलाचा पहारा संपूर्ण घराला असल्याने कोणीही आत जाऊ शकत नव्हते तर आतील कोणी बाहेर येऊ शकत नव्हते. रात्री उशिरापर्यंत ईडीचे पथक देशमुख यांच्या निवासस्थानी होते. मात्र अधिकृतपणे या पथकाकडून माध्यमांना कोणतीही माहिती सांगण्यात आली नाही.
मायणी येथे देशमुख कुटुंबीयांच्या घरी ईडीचा छापा पडल्याने मोठ्या प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दलाचा पहारा होता. एक किलोमीटर परिसर पूर्णतः सील करण्यात आला होता. कोणीही खाजगी व्यक्ती या परिसरात जाऊ शकत नाही, असा कडेकोट बंदोबस्त ईडीच्या अधिकार्यांनी या गावात केला होता. त्यामुळे संपूर्ण गाव भयभीत झाले आहे.
खटाव तालुक्यातील मायणी येथील देशमुख कुटुंबीयांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी दिवसभर चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान घरात फक्त महिला व लहान मुले असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान अधिकार्यांनी पूर्णपणे गोपनीयता बाळगली होती. प्रसिध्दी माध्यमांना कोणतीच माहिती देण्यात आली नाही.
मायणी : सन 2022 मध्ये ‘ईडी’चे समन्स आल्यानंतर मी ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहून पूर्ण माहिती दिली असतानादेखील केवळ राजकीय हेतूने माझ्यावर ‘ईडी’ची कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग व महात्मा फुले योजना महाराष्ट्र शासन या विभागाला मी सन 2022 साली भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात कोरोना काळात केलेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल केली होती. मायणी मेडिकल कॉलेजचे कोणतेही संचालक पद अथवा सदस्य पद माझ्याकडे नाही. माझा मेडिकल कॉलेजशी कसलाही संबंध नाही. केवळ राजकीय हेतूपोटी माझ्यावर ‘ईडी’ची कारवाई करण्यात येत आहे. तरी याबाबत मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘ईडी’च्या विरोधात याचिका दाखल करणार आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माझा लढा कायम राहील. त्यांनी माझी कसल्याही प्रकारची चौकशी करायला भाग पाडले, तरी मी लढणार्यातला आहे, माघार घेणार्यातला नाही, अशी प्रतिक्रिया हिम्मत देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.