बामणोली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे तीन दिवस मुक्कामी आले आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी भेटायला आलेल्या नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी सोडवल्या.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर किनारी तयार केलेल्या हेलिपॅडवर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उतरले. त्यांचे प्रशासनाकडून जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी स्वागत केले.
यावेळी महिला संपर्कप्रमुख रेश्मा जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ, पंचायत समिती सदस्य संजय मोरे, विशाल बोट क्लब तापोळा अध्यक्ष सुभाष कारंडे, सचिन कदम, गटविकास अधिकारी महाबळेश्वर विजय विभुते, पोलिस निरीक्षक बी. पी. सांडभोर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे हे दौऱ्यामध्ये कोयना विभाग 105 गावांमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा बैठका घेणार आहेत. तसेच शेतीमध्ये फेरफटका मारून कामे यावेळी ते मार्गी लावणार आहेत.