फलटणच्या राजे गटाचे 'सीमोल्लंघन'; सोमवारी संजीवराजे, दीपक चव्हाण 'तुतारी' फुंकणार  pudhari photo
सातारा

फलटणच्या राजे गटाचे 'सीमोल्लंघन'; सोमवारी संजीवराजे, दीपक चव्हाण 'तुतारी' फुंकणार

पुढारी वृत्तसेवा

फलटण : पुढारी वृत्तसेवा : नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या मनात तुतारी घेण्याचे असतानाही प्रवेश होत नव्हता. अखेर हो- ना, हो- ना करता करता कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आ. दीपक चव्हाण, माजी जि. प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांच्यासह राजे गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाऊन सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रवेशासाठी दि. १४ ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी फुंकण्याचा हा पक्ष प्रवेश सोहळा फलटण येथे होणार आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील फलटणचा राजे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. गेले काही दिवस वावरून बरेच रान तापले होते. रामराजेंची नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.

मात्र, अजित पवार ही नाराजी दूर करणार, असे संकेत होते. अजित पवारांनी रामराजेंना भेटणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, १४ तारखेला फलटणला आणखी एक पक्ष प्रवेश होईल, असे शरद पवार म्हणाले होते. या संदर्भात रामराजे ना. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे ना. निंबाळकर, विश्वजीतराजे ना. निंबाळकर, राजे गटाचे गावोगावचे मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ. रामराजे म्हणाले, १९९१ साली विकासासाठी आम्ही तिघे भाऊ एकत्रितत राजकारणात आलो. कार्यकर्त्यांच्या हितासाठी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता जनतेचा निर्णय सर्वोच्च मानला आहे. कार्यकर्त्यांच्या निर्णयाला माझा विरोध नाही. मनाने मी तुमच्यासोबत असून महायुतीचा प्रचार करणार नाही. अजितदादा कामाचे नेते आहेत. मी मंत्री पदापेक्षा तालुक्याचे हित पाहिले.

संजीवराजे म्हणाले, कार्यकर्त्यांना त्रास होणार असेल आणि घटक पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची पाठराखण करणार असतील तर महायुतीत राहायचं कशाला? त्यापेक्षा समोरासमोर लढू. कार्यकर्त्यांचे व त्यांच्या समर्थकांचेही म्हणणे तुतारीचेच आहे. दादासमोर आपण व्यथा मांडल्या, परिणाम काहीच झालं नाही. आपल्यातून गेलेल्या कार्यकर्त्याला त्यांच्या वरिष्ठांनी पद दिलं. तरीही आपण गप्पच राहिलो तर कार्यकर्त्यांचा आपल्यावर विश्वास राहणार नाही.

आता काय व्हायचं ते होईल, निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना निदान ठाम भूमिका उघडपणे घेता येईल. प्रसंगी रस्त्यावर उतरू. आपण कार्यकर्त्यांना बांधील आहोत. दुसऱ्या कुणाला नाही. खरंतर शरद पवार यांच्यामुळेच रामराजेंना व आपल्याला ताकद मिळाली. बरच काही मिळालं. अजित दादांनीही आपली काम केलीत. रामराजे आता कार्यकत्यांच्या भावनांचा आदर आपणाला करावाच लागेल, असेही संजीवराजे म्हणाले.

आ. दीपक चव्हाण म्हणाले, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून येतो. या कार्यकर्त्यांचंच खच्चीकरण होणार असेल तर त्याचा काय उपयोग? महायुतीतील घटक पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या सन्मानाची नुसतीच आश्वासन मिळतात. कृती काहीच नाही. मग सत्तेत का राहायचं? जनतेने घेतलेला निर्णय मान्य आहे, असेही ते म्हणाले.

महायुतीचा प्रचार करणार नाही : आ. रामराजे

त्या दोन महनीय व्यक्तींमुळे हा निर्णय घ्यावा लागतो. जोपर्यंत त्या दोन व्यक्तींच्या हातात भाजपचा निर्णय आहे तोपर्यंत फलटण तालुक्यात भाजपबरोबर राहू शकत नाही. त्यांच्यामुळे महायुतीचा प्रयोग सातारा जिल्ह्यात होऊ शकत नाही. कार्यकत्यांचे रक्षण करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे, त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे सांगून रामराजे ना. निंबाळकर यांनी मी मनाने तुमच्यासोबत आहे. महायुतीचा प्रचार मी करणार नाही, असेही त्यांनी सांगून टाकले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT