सातारा : सातार्यात बेकायदा ड्रग्जचे इंजेक्शन बाळगणार्याला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी शिकावू डॉक्टरसह आणखी तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दि. 6 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला असून आणखी अटकसत्र वाढणार आहे.
साईकुमार महादेव बनसोडे (वय 25, रा. भोसे ता. पंढरपूर, जि. सोलापूर), सुदीप संजय मेंगळे (वय 19, रा. सदरबझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय 20, रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) अशी अटक केलेल्यांची व पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. यातील साईकुमार बनसोडे हा वैद्यकीय शिक्षण घेत असून शिकावू डॉक्टर आहे. सातारा शहर पोलिस दोन दिवसांपूर्वी शहरातील चारभिंती परिसरात गस्त घालत असताना शिवराज पंकज कणसे (वय 25, रा.हिलटॉप सोसायटी, सदरबझार, सातारा) याला पकडले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मेफेंटरमाईन नावाचे नशा करण्याचे इंजेक्शन होते. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 11 हजार रुपयांचा साठा जप्त केला. नशेची इंजेक्शन विकण्याचा मुख्य सूत्रधार कणसे हा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवला. यावेळी त्याने आणखी तीन साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. सातार्यात नशेच्या इंजेक्शनचे रॅकेट मोठे असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी इतर तीन संशयितांची धरपकड केली. या संशयितांमध्ये शिकावू डॉक्टरचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली.
पोलिसांनी तिघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली. दरम्यान, ही कारवाई सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शाम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, सुजीत मोरे, पंकज मोहिते, निलेश जाधव, विक्रम माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा शहर पोलिस सातार्यातील वाढत्या ड्रग्जप्रकरणी अलर्ट झाले असून इंजेक्शन रॅकेटचा भांडाफोड केला आहे. प्राथमिक माहितीनुसार 1 इंजेक्शन 1 ते 3 हजार रुपयांना विकले जात होते. या इंजेक्शनमुळे नशा होेते व त्याचा प्रभाव 6 ते 15 तासांपर्यंत राहत असल्याचे समोर आले आहे. वास्तविक हा जीवघेणा प्रकार असून इंजेक्शन कुठून मिळत आहेत? ती किती रुपयांना मिळत आहेत? सातार्यातील यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होणार का? याकडे लक्ष लागले आहे.