सातारा

Satara News : सातार्‍यात पाणीगळती रोखण्यासाठी हेल्पलाईन

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची माहिती : पाण्याची नासाडी केल्यास कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्यासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी वितरण व्यवस्थेचे पूर्व नियोजन करण्यात आले आहे. अपुरा पाणीपुरवठा होणार्‍या भागातील पाणीप्रश्न सोडवण्यात येणार आहे. पाण्याची नासाडी करणे, अनाधिकृत नळकनेक्शन्स व नळांना मोटारी लावल्यास कारवाई होणार आहे. पाणी गळतीची माहिती देण्यासाठी सातारा पालिकेने हेल्पलाईन सेवा सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी दिली.

सातारा पालिकेत उपनगराध्यक्षांच्या दालनात पाणीपुरवठा विभागाची बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी विनोद जळक, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, दिग्‍विजय गाढवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संजय जंगम, घंटेवारी कर्मचारी उपस्थित होते. बैठकीनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, सातारा शहर व उपनगरात प्राधान्याने पाणीगळती रोखण्यावर काम करण्यात येणार आहे. पाणी टाक्या ओव्हरफ्लो होणे, पाण्याचा अपव्यय झाल्यास संबंधित कर्मचारी तसेच पाण्याची नासाडी केल्यास नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदेशीर नळकनेक्शन्स, नळांना मोटारी लावल्यास कारवाई होईल. शहरातील काही भागात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. कास धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले, जिल्ह्यातील धरणे भरली असली तरी पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उन्हामुळे जलसाठ्यांमधील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे.

सातारा शहरातील पाणी पाणीगळतीसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. पाणीगळती पूर्णपणे बंद करण्यावर फोकस करण्यात येत आहे. शहराचा पूर्व भाग, शनिवार पेठ, सोमवार पेठ, करंजे पेठ, माची पेठ परिसराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्यात येणार आहे. आवश्यक ठिकाणी टँकरचे नियोजन करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT