Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale | दुष्काळाबाबत इतर तालुक्यांचाही योग्य निर्णय होईल : ना. शिवेंद्रराजे

जिल्ह्यातील जावलीसह पाटण, कोरेगाव, वाई, कराड या तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश नाही

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्य शासनाने दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावलीसह पाटण, कोरेगाव, वाई, कराड या तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश झालेला नाही. मात्र या तालुक्यांमध्येही दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करावा याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. ट्रिगर २ मध्ये या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश होण्याबाबत योग्य निर्णय होईल. त्यामुळे जावलीसह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये व हवालदिल होऊ नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.

ना. शिवेंद्रराजे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. ट्रिगर १ निकषानुसार या तालुक्यांचा दुष्काळी तालुके म्हणून समावेश झाला आहे. पर्जन्यमनाच्या आधारे दुष्काळाची प्राथमिक परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच एखाद्या तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत पाऊस लक्षणीय कमी होणे असा ट्रिगर १ चा अर्थ आहे.

दरम्यान, पावसाच्या कमतरतेचा प्रत्यक्ष शेती किंवा वनस्पतीवर परिणाम झाल्याचे निदर्शनास येणे याला ट्रिगर २ असे संबोधले जाते. म्हणजे केवळ पाऊस कमी नाही तर, त्याचा पिकांवर प्रत्यक्ष परिणाम झाला आहे असा पुढचा स्तर आहे. त्यामुळे ट्रिगर २ च्या निकषांमध्ये जावली तालुक्याबाबत निर्णय होईल. बहुतांश सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे या तालुक्यांचाही समावेश दुष्काळी तालुके म्हणून व्हावा, याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली आहे.

दरम्‍यान, विरोधकांना बोलण्यासाठी काहीही शिल्लक नाही त्यामुळे ते दुष्काळाचे कारण पुढे करून बिनबुडाचे आरोप करत तोंडाची हवा करत आहेत. विरोधकांना फक्त टीका करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे, ते तेवढंच करणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. येत्या काही दिवसात जावलीसह उर्वरित तालुक्यांच्या दुष्काळाबाबत निश्‍चितच योग्य निर्णय होईल, यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे, असेही पत्रकात म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT