पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांचे प्रश्न, आरोग्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रात सकस लिखान केलेले लेखक, नाटककार, वक्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वय ६०) यांचे आज (गुरुवार) दुपारी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. डॉ. अभ्यंकर (Dr Shantanu Abhyankar) यांचे अत्यंसंस्कार त्यांचे मूळ गाव असलेल्या वाई (सातारा) येथे होणार आहेत. अभ्यंकर वाई येथे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी असा परिवार आहे.
डॉ. अभ्यंकर यांना फफ्फुसांचा कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे निधन झाले. डॉ. अभ्यंकर यांचे शिक्षण पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून झाले होते. त्यांनी प्रसूतीशास्त्रात मास्टरेट केली होती. डॉ. अभ्यंकर वाई येथे प्रॅक्टिस करत होते.
वाई येथे डॉक्टर म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होतीच, त्याच जोडीने त्यांनी वर्तमानपत्रांतून, ब्लॉगच्या माध्यमातून लेखन केले. विविध विषयांवर पुस्तके लिहिली. डॉ. अभ्यंकर यांनी त्यांच्या विविध भाषणांतून विज्ञानवादी भूमिका ठोसपणे मांडली आहे. डॉ. अभ्यंकर यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला होता. Dr Shantanu Abhyankar
डॉ. अभ्यंकर यांची काही चर्चेतील पुस्तकांत शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, फादर टेरेसा आणि इतर वल्ली, आरोग्यवती भव, यांचा समावेश आहे. तसेच रिचर्ड डॉकिन्स आणि जादुई वास्तव हे त्यांचे अनुवादित पुस्तक आहे. डॉ. अभ्यंकर यांनी विविध दिवाळी अंकांतून सकस लेखन केलेले आहेत.
राज्य सरकारच्या आनंदीबाई जोशी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित होते. वाईच्या लोकमान्य.टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष, वसंत व्याख्यानमालेचे आधारवड, उत्तम संघटक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक खंदा कार्यकर्ता, विज्ञानवादी आणि पुरोगामी विचारांचा मानवतेचा पुरस्कर्ता अशी त्यांची ख्याती होती
२०२२ साली त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्यांनी स्वतःला झालेल्या आजारबद्दल लेख लिहिला होता.