सातारा

Dr. Rupanwar Death Case: डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या मृतदेहासह नातेवाईकांचा ठिय्या

फलटणमध्ये जमावाचा रुग्णालयाला घेराव : सखोल चौकशीचे प्रशासनाचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांसाठी बुधवारी हजारो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयासमोर घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कुटुंबीयांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्याचे प्रशासनाने, तर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने आश्वासन दिले. आरोग्य विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी डॉ. रूपनवर यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयातून त्यांच्या मूळगावी फडतरी (मांडवी, ता. माळशिरस) येथे अंत्यविधीसाठी नेले.

डॉ. रूपनवर यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीय, फडतरी ग्रामस्थ आणि धनगर समाजबांधव आक्रमक झाले होते. बुधवारी डॉ. रूपनवर यांचा मृतदेह घेऊन त्यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालय गाठले. दरम्यान, संशयितांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, सेवेत असलेल्या दोषींवर बडतर्फीची कारवाई करावी, कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, तसेच उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या.

बुधवारी सकाळपासूनच उपजिल्हा रुग्णालयाबाहेर हजारो नागरिक जमा झाले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पार्थिव घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल होताच संतप्त जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात नेण्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. माजी आमदार डॉ. रामहरी रूपनवर, नातेवाईक आणि सहकारी डॉक्टरांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या नातेवाईक व ग्रामस्थांचा पोलिस प्रशासनाविरोधातील संताप यावेळी प्रकर्षाने दिसून आला.

नातेवाईक आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दोन-तीन वेळा शाब्दिक वादाचे प्रसंग घडले. काही नातेवाईकांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तुमच्या चुकीच्या भूमिकेमुळे आमचा राजेंद्र गेला,’ अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, एका नातेवाईकाने डोळ्यांत अश्रू आणून प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. ‘मग आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून त्याला न्याय मिळत नाही का? येथे पुढाऱ्याचा पोरगा असता तर मंत्री आले असते, मोठे अधिकारी आले असते. मेंढपाळाचा पोरगा आहे म्हणून इथे अधिकारी येत नाहीत का? नेते येत नाहीत का? मंत्री येत नाहीत का? मेंढपाळाच्या पोरांनी शिकायचे नाही का? आताशी कुठे आमची मुले शिकायला लागली आहेत, तर आमच्यावरच अन्याय होत आहे. गरिबाला न्याय मिळणार आहे का?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुपारी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. या प्रकरणात यापूर्वी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून, आणखी पाच जणांविरुद्ध नव्याने गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गोडसे यांनी दिली. तपासाची माहिती कुटुंबीयांना देण्यात येईल आणि कायद्यानुसार संशयितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, डॉ. रूपनवर कुटुंबीयांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे तातडीने पाठविण्यात येतील, असे प्रांताधिकारी आंबेकर यांनी सांगितले. पार्थिव रुग्णालयात दाखल होताच कुटुंबीयांच्या आक्रोशाने परिसर हेलावून गेला. या संपूर्ण घटनेमुळे फलटण शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार उचित कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य विभाग रूपनवर कुटुंबीयांच्या पाठीशी आहे.’
- डॉ. विजय कंदेवाड, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT