सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा जिल्हा परिषदेत घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. जनतेचा कौल लक्षात घेऊन त्यानुसार भविष्यातील घडामोडी घडतील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिंदे म्हणाले, आमचा प्रयत्न एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या बाबतीत झालेला आहे. शेवटी निर्णय हा सामुदायिकपणे घ्यावयाचा आहे. प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढे जाऊन एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहे.
भाजपविरहीत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार का, या प्रश्नावर शिंदे म्हणाले, त्यादृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे. भाजपच्या अनेक लोकांना आत्मविश्वास होता आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद ताब्यात घेऊ. त्यांनी अनेकांच्या मतदारसंघांत आव्हान निर्माण केले होते. त्यामुळेच त्यांच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. गटांमध्ये व पंचायत समिती गणांमध्ये जनतेचा कौल लक्षात घ्यायला पाहिजे. जनतेने काय कौल दिला आहे, त्यानुसार भविष्यातील घडामोडी घडतील.