पुसेसावळी : धुलीवंदन सण आला की पुसेसावळीकरांना आता एका अनोख्या प्रथेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी हे गाव एकेकाळी आगळ्यावेगळ्या परंपरेमुळे चर्चेचा विषय ठरत असे. धुलीवंदन ते रंगपंचमी या पाच दिवसांत गावात ‘जावई शोध मोहीम’ राबवली जाई आणि जावई सापडला की त्याची थेट गाढवावरून मिरवणूक निघे!
ही केवळ मिरवणूक नव्हती, तर रंग, हशा आणि खोडकर चेष्टामस्करीने भरलेला लोकउत्सव होता. गावातील तरुण मंडळी आधी जावयाचा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे गाढवाचा शोध घेत. जावई सापडताच वाजतगाजत त्याला गाढवावर बसवले जाई. गळ्यात फुलांच्या हाराऐवजी टायर, अंगावर रंगांबरोबर अंड्यांचा वर्षाव, आणि गावभर प्रदक्षिणा असा हा अनोखा सोहळा रंगत असे. या मिरवणुकीचा शेवट मात्र सासऱ्याच्या दारी होत असे. तिथे जावयाला गरम पाण्याने सुगंधी अंघोळ घातली जाई, नवे वस्त्र परिधान करून सन्मान केला जाई. ऐपतीप्रमाणे सोन्याचा दागिनाही खास भेट दिली जाई. त्यामुळे या ‘खोडकर शिक्षेला’ शेवटी सन्मानाची किनार लाभे.
जवळपास 75 वर्षे ही परंपरा गावात जोमाने पाळली गेली. परिणामी, धुलीवंदन ते रंगपंचमी या काळात पुसेसावळीचे जावई गावात येण्याचे टाळत. काहींनी तर या भीतीपोटी गाव सोडल्याच्या कथा सांगितल्या जातात. तर काही धाडसी जावयांनी स्वतःहून मिरवणूक काढून घेत ‘सुटका’ करून घेतल्याच्या आठवणी आजही रंगतात.
‘गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी,’ असे म्हणत गावकरी आजही त्या रंगीबेरंगी परंपरेची चर्चा करतात. परंपरा जरी थांबली असली, तरी पुसेसावळीच्या इतिहासात ‘जावयांची गाढव मिरवणूक’ ही एक वेगळी ओळख म्हणून कायम स्मरणात राहीली आहे.
जावयांच्या मनात आजही त्या आठवणी ताज्या....
काळाच्या ओघात ही प्रथा थांबली. बदलत्या सामाजिक जाणीवा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आणि सन्मानाच्या संकल्पनांमुळे अशा परंपरांना विराम मिळाला. मात्र, पुसेसावळीच्या जावयांच्या मनात त्या दिवसांच्या आठवणी आजही ताज्याच आहेत. काहींसाठी गमतीशीर, तर काहींसाठी थोड्या धडकी भरवणाऱ्या.