Sushma Andhare | सातारा ड्रग्ज रॅकेट पकडण्याची गृहमंत्र्यांची इच्छा आहे का? Pudhari File Photo
सातारा

Sushma Andhare | सातारा ड्रग्ज रॅकेट पकडण्याची गृहमंत्र्यांची इच्छा आहे का?

सुषमा अंधारेंचा सवाल; मागितली सुरक्षेची हमी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : सातारा जिल्ह्यातील सावरी येथे ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधीचे ड्रग्ज पकडण्यात आले. या रॅकेटमध्ये बांगला देशी देखील होते. आता यांच्यावर कुणी प्रश्न का उपस्थित करीत नाही? ड्रग्ज रॅकेटवर कारवाई करण्याची राज्याच्या गृहमंत्र्यांची खरोखरच इच्छा आहे का, असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी येथे केला.

ड्रग्ज कारवाईसंदर्भात याआधी ज्यांनी भूमिका मांडली होती, त्यांच्यावर रेड टाकण्यात आली. नवाब मलिक यांच्याबरोबर काय झाले, हे राज्याने बघितले आहे. तशीच मला देखील काळजी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करेन की, त्यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणीही अंधारे यांनी केली. 13 तारखेला सकाळी सावरी गावात ड्रग कारवाई झाली. एकूण 3 कारवाया झाल्या आहेत. वर्धा, मुलुंड आणि पुण्यात कारवाई झाली.

विशाल मोरे हा अजित पवार यांचा पदाधिकारी आहे. त्याला ताब्यात घेतले. सावरी गावात एक कारवाई झाली. सातार्‍यापासून 40 किलोमीटर अंतरावर असणारे गाव आहे. मी त्या गावात जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितली आहे. या कारवाईमध्ये 45 किलो ड्रग सापडले आहेे. तिथे जे रिसोर्ट आहे, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा आहे. ज्या शेडमध्ये ड्रग सापडले ती गोविंद शिंदकर यांच्या मालकीची आहे. ओमकार डिगेकडे चावी होती. त्याला अटक करून सोडून दिले आहे.

तसेच, सातार्‍यात जाऊन मुंबई पोलिसांनी का कारवाई केली? आत्मजित सावंत या पोलिस अधिकार्‍याने ही कारवाई केली. तिथून अजून एक माणूस फरार झाला, त्याचे नाव रणजित शिंदे आहे. हा रणजित शिंदे युवसेनेचा तालुकाप्रमुख असून, शिंदे यांच्या गावचा सरपंच आहे. कायम सय्यद, हाबीजुल इस्लाम, खलील रेहमान असे तिघे या शेडमध्ये राहत होते. हे आसाममधून कसे आले? यांना कुणी आणले? असा सवालही अंधारे यांनी या वेळी विचारला.

याशिवाय तुषार दोषी हे सातार्‍याचे एसपी आहेत. त्यांनी माहिती लपवली आहे का? हे लोक तिकडे काम काय करीत होते? तिकडे का राहत होते? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. या तीन लोकांना जेवण हे प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलवरून जात होते. हे सगळे प्रकरण समोर येऊ दिले जात नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT