सातारा : सातार्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी डॉक्टरवर दाखल झालेल्या ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्ह्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. पीडित मुलीने व तिच्या कुटुंबीयांसह वकिलाने थेट डॉक्टरकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. खंडणी दिल्यास ‘पोक्सो’चा गुन्हा मागे घेणार असल्याचे संशयितांनी सांगितल्यानंतर डॉ. अदिश रमेश पाटील (वय 42, रा. सदरबझार, सातारा) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे.
अॅड. मनजित माने याच्यासह संशयित दोघींवर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार डॉ. अदिश पाटील यांचा सदरबझार येथे दवाखाना आहे. दोन महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने त्यांच्याविरोधात ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मानसिक तणावामुळे डॉ. पाटील सातार्यातून बाहेर निघून गेले होते. त्यानंतर डॉक्टर तपासकामी पोलिसांसमोर वेळोवेळी हजर राहिले व पोलिसांना तपासात सहकार्य केले. दरम्यान, दि. 2 सप्टेंबर रोजी डॉ. पाटील सातार्यात असताना त्यांचा मावस भाऊ अॅड. अक्षय माने यांनी त्यांना माहिती दिली की, पोक्सोतील तक्रारदार मुलगी, तिची आई या दोघी अॅड. मनजित माने यांच्या शब्दाबाहेर नाहीत. तडजोड केल्यास त्या दोघी तक्रार मागे घ्यायला तयार आहेत.
यानंतर डॉ. अदिश पाटील व अॅड. मनजित माने यांची वेळोवेळी चर्चा झाली, भेटही झाली. विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी 50 लाख रुपये द्यावे लागतील, असेही दोघींनी सांगितल्याचे अॅड. मनजित माने यांनी डॉ. पाटील यांना सांगितले. केस खोटीच असून पैशासाठीच दाखल केली आहे, असेही अॅड. मनजित माने यांनी सांगितले. मात्र, डॉ. पाटील यांनी इतके पैसे जमणार नाहीत, असे सांगितले. यावर 25 लाख रुपये चालतील, असे अॅड. मनजित माने यांनी सांगितल्याचे डॉ. पाटील यांचे म्हणणे आहे. याबाबतचे संभाषण फोनमध्ये रेकॉर्डिंग झाले आहे. पैसे उकळण्यासाठीच ‘पोक्सो’चा खोटा गुन्हा दाखल झाल्याची खात्री झाल्याने अखेर डॉ. पाटील यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
गुन्हेगार टोळीचा सहभाग असल्याचा फिर्यादित उल्लेख
डॉ. अदिश पाटील यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देताना अनेक बाबी सांगितल्या आहेत. यामध्ये मोबाईलचे रेकॉर्डिंग असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच, पोक्सोचा खोटा गुन्हा दाखल करण्यामागे एखाद्या गुन्हेगारी टोळीचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यामुळे पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.