माऊलींच्या पादुकांना भाविक व वारकऱ्यांच्या उदंड उत्साहात नीरा नदीत अभ्यंगस्नान घालण्यात आले.  
सातारा

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala : लोणंदनगरीत वैष्‍णवांचा मेळा

नीरा नदीत पादुकांचे अभ्यंगस्नान : भाविकांकडून पुष्पवृष्टी

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत जाधव

लोणंद : माऊलींच्या पालखी सोहळ्यास भव्य आणि वैभवशाली स्वरूप देणारे पुण्यवान हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात बुधवारी दुपारी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. दुपारी दोनच्या सुमारास पाडेगाव हद्दीत पालखीने जिल्ह्यात प्रवेश करताच पुष्पवृष्टी, फुलहार आणि ‘माऊली... माऊली... माऊली’च्या अखंड जयघोषात जिल्हावासीयांनी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. याच वेळी पावसाचा शिडकावा होऊन माऊलींचे जलधारांनी स्वागत केले.

यापूर्वी दुपारी दीडच्या सुमारास नीरा नदीच्या दत्त घाटावर श्रींच्या पादुकांना पारंपरिक विधिपूर्वक अभ्यंग स्नान घातले. हा लोभस आणि भावस्पर्शी सोहळा पाहण्यासाठी नीरा नदीच्या दोन्ही तीरांवर, दोन्ही पुलांवर तसेच नदीपात्र परिसरात सकाळपासूनच वारकरी आणि भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ‘धन्य आज दिन झाले, संतांचे दर्शन झाले’ अशी भावना व्यक्त करत हजारो भाविकांनी हा अविस्मरणीय सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला.

पुणे जिल्ह्यातील ७ मुक्काम पूर्ण करून पालखी सोहळ्याने बुधवारी पहाटे वाल्हे येथून प्रस्थान केले. पिंपरे बुद्रुक येथे न्याहारीनंतर सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीकाठी दाखल झाला. नदीच्या एका बाजूला पुणे तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्हा असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील भाविक सकाळपासूनच मोठ्या संख्येने जमा झाले होते. ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत असला तरी ऊन- सावलीचा खेळ सुरू होता. मात्र, माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

तीन भोंगे संपल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास पालखीने नीरा येथून प्रस्थान केले. रथावरील २७ दिंड्या पुढे गेल्यानंतर माऊलींच्या पादुका जुन्या पुलावरून जिल्ह्याच्या तीरावर आणल्या. सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांच्यासह मानकऱ्यांनी पादुका हातात घेऊन दत्त घाटावर नेल्या. यावेळी जुन्या पुलापासून घाटापर्यंत ‘माऊली... माऊली... माऊली’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी प्रशासनाच्या वतीने उभारलेल्या बॅरिकेटच्यामध्ये माऊलींना फुलांच्या पायघड्या घातल्या; तर स्नानाच्‍या वेळी गुलाब पाकळ्यांचा पुष्पवर्षाव केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT