सातार्‍यात डीजेचा आव्वाज Pudhari Photo
सातारा

सातार्‍यात डीजेचा आव्वाज; पोलिसांचा दणका

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

विसर्जन मिरवणुकीत सातारा शहरात यंदा डीजेचा कानठळ्या बसवणारा आव्वाज झाला असून दणदणाटाबरोबरच दुसरीकडे बीमर लाईटिंगचे स्तोम माजले. बेधुंद वातावरणात डीजे चालक व बीमर लाईटिंगची चांदी झाली असली तरी पोलिसांनी दुसरीकडे गुन्ह्याचे अस्त्र उगारले. तब्बल 35 डीजेंच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले तर 12 बीमर लाईट चालकांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी दणका दिला आहे.

सातार्‍यात यंदा डीजेचा विषय गणपती आगमनापासूनच ऐरणीवर आला. पोलिसांनी केवळ स्थानिक पातळीवर बैठका घेत डीजे लावू देणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र, गणेश मंडळांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यातून वाद वाढू लागल्याने अखेर गणपती बसल्यानंतर सातार्‍यात पोलिसांना बैठक घेण्याची वेळ आली. दुर्देवाने या बैठकीत पोलिसांनी तलवार अक्षरश: जाहीररित्या म्यान केली. यामुळे डीजेचा दणदणाट होणार हे स्पष्ट झाले होते.

बुधवारी सांयकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर बीमर लाईटिंगने सातारकरांना चक्कर आली. आचकट-विचकट लाईटिंगच्या फोकसमुळे झगमगाट होवू लागला. सातारा जिल्हाधिकारी यांनी बीमर लाईटिंग, लेझरला बंदी असल्याचे आदेश काढले असताना सातार्‍यात त्याला जुमानले गेले नाही. बीमर लाईटिंगचे स्तोम पाहून पोलिसांनी तात्काळ अ‍ॅक्शन घेण्यास सुरुवात केली. सातारा शहर पोलिसांनी बीमर लाईटिंगप्रकरणी सर्वाधिक 8 गुन्हे दाखल केले. कोल्हापूरवाला बीमर लाईटिंग, रुपेश भोसले याची एसआर लाईट, किंग बीमर लाईट कोरेगाव, महादेव खापणे याचा कोल्हापूर लाईट, ब्रदर बिम लाईट यांचा समावेश आहे.

यासोबतच शाहूपुरी पोलिसांनी व सातारा तालुका पोलिसांनीही कारवाई केली आहे. प्राथमिक माहितीनुसार 12 बीमर लाईट चालकावर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी एकीकडे बीमर लाईटिंग चालकांवर कारवाईचे अस्त्र उगारल्यानंतर दुसरीकडे डीजेवरही वॉच ठेवला. वास्तविक डीजे चालकांना कुठेही पोलिसांनी अडवले नाही. केवळ डीजेची यंत्रणा किती आहे हे पाहिले. रात्री उशीरा डीजेचा दणदणाट वाढू लागल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा फास आवळला. डीजेचे डेसिबल मोजण्यासाठी शासकीय पंच व डेसिबल मशीन आणण्यात आले.

दोन टप्प्यात प्रत्येक डीजेच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. सातारा शहर, शाहूपुरी यांनी तब्बल 35 डीजेच्या दणदणाटाच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थानिक पोलिसांनी केले असून लवकरच ते आता डीवायएसपी कार्यालयाला पाठवले जाणार आहेत. तेथून हे प्रस्ताव न्यायालयात दाखल केले जाणार आहेत. यानंतर डीजे चालक व मंडळ चालकांच्या मागे कारवाईचा भुंगा लागणार आहे.

पोलिसांकडून कारवाईचा फास आवळणार

सातार्‍यात गेल्या दोन वर्षात डीजेचा ताळतंत्र सुटलेला आहे. राज्यशासनाचे गळचेपी धोरण ठरत असल्याने पोलिसांचे त्यामध्ये हाल होत आहेत. यावर्षीही तिच परिस्थिती राहिली. मात्र, पोलिसांनी ‘एक दिवस तुमचा, बाकी दिवस आमचे’, असे सूत्र अवलंबले. डीजे वाजवा पण आम्ही त्याचे नमुने घेणार व प्रकरण कोर्टात दाखल करणार असा पवित्रा घेतला व आतापर्यंत तरी तशी कार्यवाही झालेली दिसत आहे. कारवाईचे पुढील दोन टप्पे महत्वाचे आहे. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सातारकरांचे लक्ष राहणार आहे.

तडीपारीची रेकॉर्डब्रेक कारवाई

सातारा शहर, शाहूपुरी व तालुका पोलिसांनी तब्बाल 150 जणांना तात्पुरत्या तडीपारीचा दणका दिला. यावेळी तडीपार केल्यानंतर जो त्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावण्यात आला. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीयचे सागर निकम, विश्वनाथ मेचकर, गणेश जाधव, धीरज मोरे यांनी कारवाईचा धडाका केला. एकट्या शहर पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केले. ही आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक कारवाई मानण्यात येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT