सातारा : सातार्यातील देवी चौकात गणपती आगमन सोहळ्यात शिवतेज गणेश मंडळाकडून होणारा डीजेचा दणदणाट पोलिसांनी रोखला. यावेळी बीम लाईट लावून नागरिकांना त्रास होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, पोलिस कारवाई करत असताना जनरेटरचा टेम्पो घेऊन एकजण पळून गेला आहे.
डीजे चालक रजनीकांत चंद्रकांत नागे (वय 41, रा. मल्हार पेठ, सातारा), धीरज रमेश महाडिक (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), दीपक राजेंद्र जगताप (रा.भोसरी, पुणे) व हर्षल राजाराम शिंदे (रा.पाटखळ ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील रजनीकांत नागे हा डॉल्बी चालक, दिपक जगताप व धीरज महाडीक हे बीम लाईट चालक तर हर्षल शिंदे ट्रॅक्टर चालक आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस अमोल साळुंखे यांनी पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द तक्रार दिली आहे. रविवारी पोलिसांचा राजवाडा परिसरात बंदोबस्त होता. यावेळी शिवतेज गणेश मंडळ, बुधवार पेठ, सातारा यांचा गणेश आगमन सोहळा सायंकाळी साडेसहा वाजता सुरु झाला. मंडळाची मिरवणूक देवी चौकात आली.
या मंडळाच्या मिरवणुकीत रजनी साऊंड सिस्टीम याच्या मालकाला पोलिसांनी स्पिकरचा आवाज मर्यादेत ठेवण्याची नोटीस अगोदरच बजावली होती. तरीही मंडळाच्या समोर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये लोखंडी अँगल लावून मोठे साऊंड ठेवून कर्णकर्कश आवाज केला. तसेच बीम लाईट लावून नागरिकांना त्याचा त्रास होईल अशा पध्दतीने मानवी जिवीतास उपद्रव केला. यामुळे पोलिसांनी डिजे तसेच बीम लाईट असा सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. रात्री उशीरापर्यंत पंचनामा करुन चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 8 साऊंड सिस्टीम, 1 मिक्सर मशिन, 1 ट्रॅक्टर, 2 टेम्पो, 1 जनरेटर, लाईट सिस्टीम सेट याचा समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेला सर्व मुद्देमाल पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागे ठेवला आहे.