महाबळेश्वर : गुलाबी थंडी, हिरवाईने नटलेला निसर्ग आणि नयनरम्य पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गजबजून गेले आहे. देश-विदेशातील पर्यटकांची पावले या थंड हवेच्या ठिकाणाकडे वळली असून वेण्णालेकसह प्रमुख प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आल्हाददायक वातावरण, सूर्योदय-सूर्यास्ताची विहंगम दृश्ये आणि निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेलाही चांगली चालना मिळाली आहे.
महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षण असलेल्या वेण्णालेक परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले आहे. नौकाविहारासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागत असून घोडेस्वारी आणि लहान मुलांच्या मनोरंजनाच्या खेळांमध्येही पर्यटक रमले आहेत. थंडगार वातावरणात नौकाविहाराचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत. स्ट्रॉबेरीपासून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मक्याचे कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ आणि पावभाजीचा आस्वाद घेण्यासाठीही खवय्यांची गर्दी होत आहे.
केट्स पॉइंट, ऑर्थर सीट, लॉडविक पॉइंट, विल्सन पॉइंट, मुंबई पॉइंट, लिंगमळा धबधबा, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर आणि ऐतिहासिक प्रतापगड या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. विल्सन पॉइंटवरील सूर्योदय आणि मुंबई पॉइंटवरील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची विशेष पसंती दिसून येत आहे. हिरवाईने नटलेल्या निसर्गाचा आणि गुलाबी थंडीचा अनुभव घेत पर्यटक सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, दुकाने आणि बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दसऱ्यापूर्वीच स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावटीची कामे पूर्ण करण्यात आली होती.
महाबळेश्वरच्या बाजारपेठेत प्रसिद्ध चप्पल, चणे, जॅम, जेली, फज आणि थंडगार गोळा खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट, कानटोपी आणि मफलर खरेदीलाही पसंती मिळत आहे. खरेदीबरोबरच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये पर्यटकांची रेलचेल सुरू आहे.
वाहतूक कोंडीने पर्यटकांचे हाल...
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. वेण्णालेक ते महाबळेश्वर तसेच लिंगमळा परिसरातून शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तब्बल सहा किलोमीटरपर्यंत वाहनांची कोंडी झाल्याने पर्यटकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. त्यातच रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.