Sugarcane season: राज्याच्या गळीत हंगामाला ‘दिवाळी’चा मुहूर्त File Photo
सातारा

Sugarcane season: राज्याच्या गळीत हंगामाला ‘दिवाळी’चा मुहूर्त

मंत्री उपसमितीची महिनाअखेरीस बैठक : शेतकर्‍यांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्यातील गळीत हंगामाला यंदाचा ‘दिवाळी’चाच मुहूर्त लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गतवर्षी विधानसभा निवडणुकांमुळे हंगाम 15 ते 20 दिवस लांबणीवर पडला होता. यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही नुकसान झाले होते. यंदा दिवाळीच्याच तोंडावर जरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्या, तरी त्याचा फारसा परिणाम हंगामावर होणार नसल्याची चिन्हे आहेत.

15 दिवस अगोदरच हंगाम सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. हंगाम निश्चितीसाठी दि. 25 सप्टेंबर रोजी मंत्री उपसमितीची बैठक होणार आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचेे वातावरण आहे. त्यातच शेतकर्‍यांना यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरवर्षी राज्याच्या मंत्री उपसमितीची बैठकीत हंगमाची तारीख निश्चित करण्यात येते. सध्याच्या घडीला मराठा आरक्षणाचे आंदोलन मुंबईत पेटल्याने अद्याप हंगामाचे नियोजन करणार्‍या समितीची बैठक झालेली नाही. हे वातावरण आणखी काही दिवस राहणार असल्यानेच महिनाअखेरीलाच मंत्री उपसमितीची बैठक होणार आहे.

गतवर्षी विधानसभा निवडणुका ऐन दिवाळीत आल्याने हंगाम 15 ते 20 दिवस लांबणीवर पडला होता. याचा फटका शेतकर्‍यांना जास्त बसला. हंगाम लांबल्याने अनेक शेतकर्‍यांचा उस वाळल्याच्या तक्रारी आहेत. तर कारखानदारांनाही उस नेताना चांगलीच कसरत करावी लागली.

ऐन उन्हात उस तोड मजुरांना तोड करावी लागली. उस लागण व तोडणीचे पूर्ण नियोजन फिस्कटल्याने त्याचा परिणाम उतार्‍यावर झाला. तर टनेज घटल्याने कारखानदारांनाही काही प्रमाणात फटका बसला.

हंगामासाठी 3 हजार 550 दर निश्चित

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने 2025-26 च्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी 10.25 टक्के उतार्‍यासाठी 3 हजार 550 रुपयांचा दर निश्चित केला आहे. तर त्यापुढील 1 टक्क्यासाठी प्रत्येक टनाला 346 रुपये मिळणार आहेत. याउलट उतार्‍याचे प्रमाण कमी झाल्यास प्रति टन 346 रुपये कमी होणार आहेत. मात्र, 9.5 टक्के पेक्षा कमी जरी उतारा असला, तरी प्रतिटनाचा किमान दर हा 3461 रुपयेच असणार आहे. यामुळे 9.5 टक्के साखर उतार्‍यासाठी कारखानदारांना शेतकर्‍यांना किमान 3 हजार 461 रुपये द्यावे लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT