सातारा : निराशेचे मळभ दूर करुन आनंद व मांगल्याचा प्रकाश पसरवत दिवाळीचा सण साजरा होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचा उत्साह वाढला असून घरोघरी दिवाळीची जय्यत तयारी सुरु आहे. सणामध्ये संस्कार व संस्कृतीचा वारसा जोपासला जात असल्याने विजेच्या झगमगाटामध्येही प्रकाशाच्या सणासाठी पणत्या व आकाशी दिव्यांची ज्योत तेवत राहते. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध आकार व प्रकाराच्या मातीच्या पणत्या, दिपमाळांसह विविध साहित्यांची रेलचेल वाढल्यामुळे दिवाळीची चाहूल जाणवत आहे. विविध प्रकारच्या आकाश कंदिलांचा झगमगाट दिसू लागला आहे.
सणांच्या माध्यमातून परंपरा व संस्कृतीचा वारसा जपला जातो. यावर्षीदेखील निराशेचे मळभ दूर करुन आनंद व मांगल्याचा प्रकाश पसरवत दिवाळीचा सण साजरा होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आल्याने सर्वत्र उत्साह वाढला असून घरोघरी जय्यत तयारी सुरु झाली आहे. घराच्या स्वच्छता व रंगरंगोटीबरोबरच सणाच्या खरेदीलाही वेग आला आहे. कपडे, साजावट साहित्य, सुगंधालये, भुसार मालाच्या दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. वर्षभरातील सर्व सणांमध्ये दिवाळीच्या सणामध्ये सर्वाधिक पारंपरिक बाज जोपासला जातो. पारंपरिक कला, संस्कृतीला उजाळा मिळतो. दिवाळीचा म्हणजे प्रकाशाचा सण असल्याने उत्सवकाळात हजारो पणत्या उजळल्या जातात. त्यामुळे दिवाळीमध्ये पणत्यांना विशेष महत्व आहे. काळानुरुप बदल होत असले तरी दिपोत्सवामध्ये मातीच्या पणत्या, लामन दिवे, दिपमाळेचे महत्व आधोरेखित होत आहे.
दिवाळीसाठी मातीच्या विविध आकार व प्रकारातील पणत्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पणत्यांमध्ये आकर्षकता व विविधता आणण्यासाठी मातीकाम करणाऱ्या कलाकारांच्या कल्पकतेतून या पणत्यांची विविध रुपे समोर आली आहेत. यामध्ये साध्या पणत्या, दिपमाळ, मातीचे कंदिल, अंबारी दिवा, लामन दिवा, फुलकारी पणती असे एक ना अनेक प्रकार सध्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. चिनीमातीच्या, भाजणीच्या पणत्याही सध्या विक्रीसाठी आल्या आहेत. या पणत्यांवर विविध प्रकारची पाने फुले, हस्तीमुख यांसह विविध प्रकारची कलाकुसरही केली असून विविध रंगसंगतीची जोड देण्यात आली आहे.
फटाक्यांबरोबरच नक्षीदार रांगोळीला महत्व...
कोणत्याही मंगलप्रसंगी रांगोळी रेखाटन केले जाते. सर्व धार्मिक कार्यक्रम असो, सण समारंभ असो की लग्न सोहळे, नवीन घर व नवीन उद्योगाच्या शुभारंभ प्रसंगी दारात रांगोळी काढली जाते. शुभकाऱ्याबरोबरच दिवाळीमध्येही रांगोळीला विशेष महत्व आहे. पहाटे होणारे अभ्यंग स्नान व दारातील रांगोळी यामुळे दिवाळीचा गोडवा संपूर्ण वातावरणात पसरतो. फटाक्यांच्या आतिषबाजीबरोबर नक्षीदार रांगोळी सणाचा महोल निर्माण करते. सातारा शहर व परिसरात ठिकठिकाणी रांगोळीची विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून पांढऱ्या रांगोळीसोबतच विविध रंगसंगतीमधील रांगोळी खरेदीला महिलांकडून पसंती दिली जात आहे.
कला-कौशल्याला वाव...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकतेसह कलाकारांच्या कौशल्याला वाव मिळाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत विक्रीस आलेल्या आकाश कंदिलांमध्ये भरपूर विविधता दिसत आहे. प्लास्टिक, कार्डशीट, पुट्ठे, सनमाईक, बांबू, कापडी, ज्यूट, जरदोशी तसेच क्राफ्ट कागदाचेही आकाश कंदिल उपलब्ध आहेत. तसेच मातीच्या विविध प्रकारातील पणत्या, लाम्हण दिवे, दिपमाळांमध्ये कल्पकता, आकर्षक कलाकुसर दिसत आहे. हार, तोरणांसह रेडीमेड रंगावलीमध्ये विविधता उपलब्ध झाली आहे.