Disability Pudhari
सातारा

Disability Welfare : दिव्यांगांच्या ५ टक्के निधीचा प्रश्न ऐरणीवर

मागील वर्षाचा निधी अद्याप प्रलंबित; ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत नाराजी, कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा
अशोक मोहने

कराड : दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतीमार्फत राखीव ठेवण्यात येणाऱ्या ५ टक्के निधीच्या वितरणात होत असलेल्या विलंबाबाबत कराड तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे. मागील आर्थिक वर्षातील निधी अनेक ग्रामपंचायतीत अद्याप अनेक ठिकाणी प्रलंबित असल्याच्या तक्रार असून, त्यामुळे दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या लाभासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्य, सहाय्यक साधने, शैक्षणिक मदत, स्वावलंबनासाठीचे उपक्रम तसेच इतर कल्याणकारी योजनांसाठी हा निधी वापरणे अपेक्षित असते. मात्र, निधी मंजूर होऊनही त्याचे वेळेत वितरण होत नसल्याने लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

मागील वर्षात ग्रामपंचायतींकडे दिव्यांग निधीअंतर्गत किती तरतूद करण्यात आली, त्यापैकी किती निधी खर्च झाला, किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आणि किती निधी शिल्लक आहे, याबाबत पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी व मंजुरी प्रक्रिया संथ गतीने होत असल्याने अनेक पात्र दिव्यांग लाभापासून वंचित राहत असल्याचीही तक्रार आहे.

दिव्यांगांच्या हक्काचा निधी वेळेत वितरित व्हावा आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी पंचायत समिती कराडने ग्रामपंचायतीनिहाय आढावा घ्यावा, अशी मागणी होत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने निधीची उपलब्धता, खर्चाचा तपशील आणि लाभार्थ्यांची माहिती सार्वजनिक करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेला निधी हा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे निधी वितरणातील दिरंगाई दूर करून पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

ग्रामनिधी मुदतीत व त्या -त्या विभागावर वितरीत होणे अपेक्षित आहे. तशा सूचना विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तरीही काही ग्रामपंचायतींनी दिव्यांगांना पाच टक्के निधीचे वितरण अद्याप केले नसेल तर त्याची माहिती माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
- प्रताप पाटील गटविकास अधिकारी पं.स.कराड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT