Satara SportsApp Launched : First of its kind initiative in the state
सातारा स्पोर्टस्अ‍ॅप कार्यान्वित : राज्यातील पहिलाच उपक्रम Pudhari Photo
सातारा

जिल्हा क्रीडा कार्यालय झाले हायटेक

पुढारी वृत्तसेवा

सातारा, पुढारी वृत्तसेवा : केंद्र असो की राज्य सरकार खेळाडूंपर्यंत पोहोचत नाही. खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत अशी नेहमीच ओरड होते. अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचता यावे, यासाठी सातारच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथमच स्वतःचे सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार केले आहे. त्या माध्यमाद्वारे खेळाडूंच्या संपर्कात राहण्याचा वेगळाच प्रयत्न केला आहे. याद्वारे इतर कार्यालयांप्रमाणे सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयही हायटेक झाले आहे.

सध्याच्या आधुनिक युगात बहुतांश गोष्टी मोबाईलद्वारे करणे शक्य झाले आहे. याच मोबाईलचा वापर करून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खेळाडूंपर्यंत पोहचण्याचा मार्ग शोधला आहे. लोक कॉम्प्युटरपेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात म्हणून या साधनाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सातारला येण्याची गरज भासू नये, हा देखील या अ‍ॅप मागचा उद्देश आहे. खेळांची माहिती, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू माहिती, शासन निर्णय याबाबत माहिती अवगत करून देण्यात येणार आहे.

त्यासाठीच कार्यालयाकडून सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून खेळाडूंना हवी ती माहिती मोबाईलच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांची नावनोंदणी करता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये सातारा जिल्ह्या विषयी माहिती देण्यात आली आहे. सरकारतर्फे खेळासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारांची यादीही प्रसिध्द करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठीची पात्रता, प्रस्ताव याचीही माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार व भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या पुरस्काराप्राप्त पुरस्कारार्थींची नावेही यात समाविष्ट करण्यात आली आहे.

अ‍ॅपमध्ये ‘या’ माहितीचाही समावेश

या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांची नावे देण्यात आली असून त्यांचे संपर्क नंबर देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोणत्या खेळाच्या स्पर्धा कधी, कुठे, केव्हा होणार याचा कॅटलॉगही आहे. खेळांच्या स्पर्धांचे वर्षभराचे वेळापत्रक देण्यात आले आहे. फोटो गॅलरीमध्ये सातारा जिल्हा क्रीडा कार्यालय, तालुका क्रीडा कार्यालये, शहरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांचे फोटो आहेत. खेळाडूंना आवश्यक असणारे सर्व मेल आयडी या विभागात आहेत. तसेच जिल्हा, तालुका क्रीडा अधिकारी यांचे पत्ते, फोन नंबर, मेल आयडी देण्यात आले आहे.

शहरासह जिल्ह्यातील खेळाडूंना कोणत्याही माहितीसाठी कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व माहिती अवगत करून देण्यात येणार असल्याने खेळाडू व मार्गदर्शकांना सोयीचे होणार आहे.
-नितीन तारळकर, जिल्हा क्रीडाधिकारी
SCROLL FOR NEXT