सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात सेवा पंधरवडा अभियान राबवण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करण्यावर प्राधान्याने भर द्यावा. शेतकर्यांच्या हितासाठी जिल्ह्यातील जास्त जास्त पाणंद रस्ते खुले करावेत. या मोहिमेला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती हा कालावधी संपूर्ण राज्यात सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, माजी जि. प. उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, सातारा प्रांताधिकारी आशिष बारकूल, सातारा तहसीलदार समीर यादव उपस्थित होते.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, सेवा पंधरवडा उपक्रमात लोकप्रतिनिधींनीही सहभाग घ्यावा. पाणंद रस्ते खुले करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने फिल्डवर जावे. लोकाभिमुख काम करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना पर्यटनाशी संबंधित सर्व बाबींचे अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ’नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून हे अभियान राज्यभर सुरू आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शेतीला जाणारे पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर खुले करणे आणि त्यांना क्रमांक देऊन ते कायम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, सातार्यात 17 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष फिल्डवर कामकाज सुरू झाले आहे. पाणंद रस्ते किंवा शेतात जाणारे रस्ते मोकळे करणे आणि रस्त्याला क्रमांक देण्यावर भर आहे. सूत्रसंचलन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले.