सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकरी वर्गाने प्रामाणिकपणे शेती कर्जाची वेळेत परतफेड केली आहे. याचाच परिणाम म्हणून बँकेने आपली वसुलीची परंपरा कायम राखत यावर्षीही शेती कर्जाची विक्रमी 97.07 टक्के वसुली करून राज्यात आदर्श विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांनी दिली.
खा. पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात सन 2025-26 करता जिल्ह्याचे एकूण पीक कर्ज वाटप उद्दिष्ठ 3600 कोटी रुपयांपैकी सातारा जिल्हा बँकेस 61 टक्के म्हणजे 2200 कोटी उद्दिष्ठ दिले आहे. त्यामध्ये खरीप पिकासाठी 1300 कोटी व रब्बी पिकासाठी 900 कोटी असे उद्दिष्ठ आहे. बँकेने खरीप हंगामाची पूर्तता करण्यापोटी 30 जून अखेर 1431 कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप केले आहे. खरीप उद्दिष्टाची 110 टक्के पूर्तता झाली आहे. उद्दिष्टांहून अधिक वाटप करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांना लाभ देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे.
ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण गतिमान करण्यासाठी बँकेने विविध योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत, असे स्पष्ट करुन खा. पाटील पुढे म्हणाले, बँकेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेतकर्यांचे आर्थिक हित जोपासण्याचा सातत्याने प्रयत्न केले आहेत. नियमित व वेळेत परतफेड करणार्या शेतकर्यांना व्याज परतावा मिळत असल्याने शेतकर्यांना पीक कर्जाबरोबरच शैक्षणिक कर्जही ‘शून्य’ टक्के व्याजदराने मिळत आहे. त्याचप्रमाणे बँकेने मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याजाचा परतावाही वेळोवेळी दिला आहे. विकास सेवा सोसायट्यांनाही वसुली प्रोत्साहन रक्कम दरवर्षी दिली जाते. तेव्हा, शेतकर्यांनी कर्जाची नियमित परतफेड करुन बँकेच्या व्याज परताव्याचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांनी केले आहे.
चालू वसुली हंगामात पीक कर्ज वसुलीसाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील सहकार विभाग, सचिव संघटना, सर्व विकास सेवा संस्थांचे चेअरमन, पंचकमिटी सदस्य व सर्व शेतकर्यांचे बँकेच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष खा. नितिनकाका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई व सर्व संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांना बँकेच्या सर्व कर्ज योजना व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.